इंदूर - भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी दोनही संघांनी कस्सून सराव केला. दरम्यान, भारतीय संघाला होळकर स्टेडियमने नेहमीच साथ दिलेली आहे. भारतीय संघ या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारात अपराजित आहे.
भारतीय संघाने बांगलादेश विरुध्दच्या टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारली. त्यानंतर आता दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. पहिला सामना इंदूरच्या मैदानावर १४ ते १८ नोव्हेंबर यादरम्यान रंगणार आहे. भारतीय संघाने होळकर स्टेडियममध्ये आतापर्यंत १ कसोटी, एक टी-२० आणि ५ एकदिवसीय सामने खेळली आहेत. या सर्व सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे.
मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेच्या २७ हजार प्रेक्षक क्षमतेच्या होळकर मैदानावर भारताचा पहिला कसोटी सामना २०१६ मध्ये न्यूझीलंड संघाविरुध्द झाला होता. या सामन्यात भारताने ३२१ धावांनी विजय मिळवला होता. दरम्यान, आता भारताचा दुसरा सामना बांगलादेश संघाविरुध्द होत आहे. या सामन्यातही यजमान भारतीय संघाची विजयी मोहीम कायम राखण्याचा करेल.
हेही वाचा - आयसीसीच्या क्रमवारीत कोहली-बुमराहचे राज्य, तर शाकिबला मोठा 'धक्का'
हेही वाचा - भारताच्या पहिल्यावहिल्या डे-नाईट कसोटी सामन्याची 'वेळ' झाली निश्चित!