मुंबई - चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली जात आहे. विराटवर सद्या टीकेचे झोड उठली आहे. या दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यास, विराटने कर्णधारपद सोडून द्यायला हवे, असे मत इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसर याने व्यक्त केले आहे.
माँटी पानेसर एका मुलाखतीत म्हणाला की, 'विराट कोहली एक महान फलंदाज आहे. पण त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला चांगले प्रदर्शन करता आलेले नाही. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ सलग चार कसोटीत हरला. मला वाटतं की, अजिंक्यने कर्णधारपद भूषवत केलेल्या कामगिरीमुळे तो दबावात आहे.'
भारतीय संघ विराटच्या नेतृत्वात चार कसोटी सामने हरला आहे. जर अशात भारतीय संघ पुढील सामना देखील हरला तर याची संख्या पाच होईल. त्यामुळे मला वाटत की, पराभव झाल्यास विराटने कर्णधारपद सोडून द्यायला हवे, असे देखील पानेसर म्हणाला.
दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला सलग चौथ्या कसोटी सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. मागील वर्षी भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. यातील दोन कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारूण पराभव झाला. त्यानंतर भारतीय संघाने विराटच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडिलेड येथे कसोटी सामना खेळला. यात देखील भारतीय संघाचा मानहानिकारक पराभव झाला. आता चेन्नई कसोटीत देखील विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ पराभूत झाला.
भारतीय संघाच्या या कामगिरीमुळे विराटची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी चाहत्यांनी केली आहे. ऑस्ट्रेलियामधून विराट पहिली कसोटी खेळून भारतात परतल्यानंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कसोटी मालिका जिंकली. हाच मुद्दा पकडून रहाणेकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हेही वाचा - कुलदीपचे प्रशिक्षक पांडे यांनी विराटसह संघ व्यवस्थापनावर केले गंभीर आरोप, म्हणाले...
हेही वाचा - श्रेयस अय्यरचा चहलच्या पत्नीसोबत भन्नाट डान्स; पाहा व्हिडिओ