दुबई - आयसीसीने विंडीजचा वेगवान गोलंदाज शॅनोन गॅब्रियलवर ४ एकदिवसीय सामन्यांची बंदी घातली आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले ४ सामने तो खेळू शकणार नाही.
शॅनोनने इंग्लंड विरुद्ध सेंट लुसिया कसोटीत आयसीसीची आचार संहिता २.१३ या नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्याला ही शिक्षा देण्यात आली आहे. तसेच त्याला सामन्यातील ७५ टक्के रक्कमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या खात्यात ३ डिमेरिट गुणांची नोंद झाली आहे.
गेल्या २४ महिन्यात त्याच्या खात्यात ८ अंक जमा झाल्याने त्याच्यावर ४ सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. आयसीसीने इंग्लंडचा कर्णधार जो रुट याला शॅनोन गॅब्रियलने समलैंगिकतेसंबंधी अपशब्द बोलला होता. त्यावर शॅनोन दोषी आढल्याने ही कारवाई केली आहे.
स्टम्प माईकमध्ये रुट आणि शॅनोन यांच्यात झालेली बाचाबाची कैद झाली आहे. त्यानंतर रुटने समलैंगिक असणे काही चुकीचे नसते अशी प्रतिक्रिया दिली. शॅनोनने त्याची चुकी मान्य केली आहे. आयसीसी मॅच रेफरी जेफ क्रो यांनी ही शिक्षा दिली आहे. मैदानातील पंच राड टकर आणि कुमार धर्मसेना यांनी रेफरीकडे तक्रार केली होती.