दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय शिक्षण-तंत्रज्ञान कंपनी बायजूसची आपली जागतिक भागीदार (ग्लोबल पार्टनर) कंपनी म्हणून घोषणा केली. बायजूस आता २०२३ पर्यंत आयसीची जागतिक भागीदार असेल.
या तीन वर्षांच्या कराराअंतर्गत बायजूस आता आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये दिसणार आहे, ज्यात भारतातील पुरुष टी-२० वर्ल्डकप आणि न्यूझीलंडमधील महिला वर्ल्डकप या स्पर्धांचा समावेश आहे. जागतिक भागीदार म्हणून, बायजूसकडे सर्व आयसीसी स्पर्धांमध्ये विस्तृत ठिकाण, प्रसारण आणि डिजिटल अधिकार असतील.
याव्यतिरिक्त, बायजूस आयसीसीबरोबर नवीन मोहीम तयार करून चाहत्यांशी असलेले संबंध अधिक वृद्धिंगत करेल. २०१९च्या ऑगस्टमध्ये बायजूस कंपनी भारतीय क्रिकेट संघाची अधिकृत जर्सी भागीदार झाली. आयसीसीचे मुख्य कार्यकारी मनु साहनी म्हणाले, "बायजूस हा भारतातील क्रिकेटचा एक समर्थ समर्थक आहे. कोट्यावधी विद्यार्थ्यांना मोठे स्वप्न दाखवण्यास प्रेरणा देणाऱ्या एका मजबूत, तरूण आणि गतिशील भारतीय ब्रँडबरोबर भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद झाला आहे."
बायझसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बायजूस रविंद्रन म्हणाले, "खेळ आणि विशेषतः क्रिकेट बहुतेक भारतीयांच्या जीवनाचा एक मोठा भाग आहे. आमच्या मनात क्रिकेटला एक विशेष स्थान आहे. जागतिक व्यासपीठावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे ही भारतीय कंपनी म्हणून आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.''