नवी दिल्ली - इंग्लंडचे अनुभवी पंच इयान गूल्ड ३० मेपासून चालू होणाऱ्या विश्वकंरडक स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार आहेत. विश्वकंरडक २०१९ स्पर्धेत १६ पंच आणि ६ मॅच रेफरी, अशा २२ अधिकाऱ्यांचा सामवेश करण्यात आला आहे. या १६ पंचांमध्ये इयान यांचाही समावेश करण्यात आला आहे.
इंग्लडसाठी १९८२ च्या विश्वकंरडक स्पर्धेत यष्टीरक्षकाच्या रुपात खेळणाऱ्या इयान गूल्ड यांनी आतापर्यंत ७४ कसोटी, १३५ एकदिवसीय तर ३७ टी-२० सामन्यात अंपायरिंग केली आहे. ६१ वर्षीय गूल्ड यांची ही चौथी विश्वकंरडक स्पर्धा असणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) क्रिकेट महाप्रबंधक ज्यॉफ एलर्डाइस यांनी अंपायरिंग क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल इयान गूल्ड यांची प्रशंसा केली आहे. यावेळी ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इयान यांचे योगदान खूप मोलाचे असून येणाऱ्या काळात मैदानावर गूल्ड यांची कमतरता भासेल. मला खात्री आहे की त्यांचे क्रिकेटप्रती असेलेले प्रेम आयुष्यभर तसेच कायम राहील.