नवी दिल्ली - भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने २०१८ च्या शेवटी क्रिकेटला अलविदा केले होते. क्रिकेटची पहिली इनिंग संपल्यानंतर आता गंभीर राजकारणाची दुसरी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे, असे वृत्त समोर येत आहे.
गौतम गंभीर भाजपकडून नवी दिल्लीत खासदारकीला उभारु शकतो. गौतम गंभीर दिल्लीतील राजेंद्र नगर भागात राहतो. राजेंद्र नगर हा भाग नवी दिल्लीत येतो. भाजपच्या मीनाक्षी लेखी सध्या नवी दिल्लीच्या खासदार आहेत. भाजप गौतम गंभीरला आता नवी दिल्लीतून उभा करण्याच्या तयारीत आहे. २०१४ च्या निवडणुकीत गौतम गंभीरने अर्थमंत्री अरुण जेटलींचा प्रचार केला होता.
यानंतर, गौतम गंभीर राजकारणात येणार अशा चर्चांना उधान आले होते. परंतु, गंभीरने त्यावेळी तो राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. गौतम गंभीरने भारतासाठी ५८ कसोटी, १४७ एकदिवसीय आणि ३७ टी-ट्वेन्टी सामने खेळले आहेत.