विशाखापट्टणम - सलामीवीर म्हणून पहिला सामना खेळत असलेल्या रोहित शर्माच्या दोनही डावातील शतकी (१७६,१२७)खेळीच्या जोरावर भारतीय संघाने आफ्रिकेसमोर ३९५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. याला प्रत्युत्तरात आफ्रिकेने चौथ्या दिवसा अखेर एक गडी गमावून ११ धावा केल्या आहेत. मार्करम (१) आणि ब्रॉयन (५)यांची जोडी मैदानात आहे. आफ्रिकेला विजयासाठी ३८४ धावांची गरज आहे. तर भारताला सामना जिंकण्यासाठी ९ गडी बाद करावे लागणार आहे.
विशाखापट्टणम येथील के राजशेखर रेड्डी मैदानावर सुरु असलेल्या कसोटी सामन्यात, चौथ्या दिवशी आफ्रिकेचा पहिला डाव ४३१ धावांवर आटोपला. तत्पूर्वी भारताने पहिला डावात ५०२ धावा केल्या होत्या. यामुळे भारताला पहिल्या डावात ७१ धावांची लीड मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने फलंदाजी करत दुसरा डाव ४ बाद ३२३ धावांवर घोषित केला.
दुसऱ्या डावात सलामीवीर मयांक अग्रवाल अवघ्या ७ धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने या दोघांनी दीडशतकी भागिदारी रचली. संघाची धावसंख्या १९० असताना पुजारा व्यक्तिगत ८१ धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने शतक झळकावले. रोहित १२७ धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजाच्या रुपाने भारताला ४ धक्का बसला. जडेजाने ४० धावांचे योगदान दिले.
यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अंजिक्य रहाणे यांनी अनुक्रमे ३१ व २७ धावांची नाबाद खेळी केली. संघाची धावसंख्या ३२३ असताना कोहलीने दुसरा डाव घोषित करत आफ्रिकेला ३९५ धावांचे लक्ष्य दिले. ३९५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतलेल्या आफ्रिकेची सुरूवात चांगली झाली नाही. संघाची धावसंख्या ४ असताना रवींद्र जडेजाने एल्गरच्या रुपाने आफ्रिकेला पहिला धक्का दिला. चौथ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. तेव्हा आफ्रिकेने १ गडी बाद ११ धावा केल्या आहेत.
हेही वाचा - बास्केटबॉल : ऐतिहासिक सामन्यात इंडियाना पेसर्सचा सॅक्रेमेंटो किंग्सवर विजय
धावफलक -
- भारत (पहिला डाव) - ५०२/७ (डाव घोषित)
- दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) - ४३१/१०
- भारत (दुसरा डाव) - ३२३/४ (डाव घोषित)
- आफ्रिका चौथ्या दिवसा अखेर १ बाद ११