मेरठ - भारताचा माजी वेगवान गोलंदाज प्रविण कुमार याच्यावर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुल्लाननगर येथील एका व्यापाऱ्याऱ्यासह ६ वर्षीय मुलाला धक्का देऊन खाली पाडल्याचा आरोप प्रविणवर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुल्ताननगर येथील रहिवाशी व्यापारी दीपक शर्मा यांचा मुलगा यशवर्धन हा मेरठ पब्लिक स्कुलमध्ये शिकतो. शनिवारी दुपारी यशवर्धनला सोडण्यासाठी शाळेची बस मुल्ताननगरमध्ये आली होती. मुलगा यशवर्धनला घेण्यासाठी त्याचे वडिल दीपक शर्मा तिथे उभे होते.
यशवर्धन बसमधून खाली उतरत होता. तेव्हा प्रविण कुमार आपल्या कारसह आला. रस्त्यामध्ये स्कूल बस थांबलेली पाहून त्याने जोरात हॉर्न वाजवण्यास सुरूवात केली. मात्र, स्कूल बस त्या जागेवर हलण्यासाठी उशीर झाला. तेव्हा प्रविण कुमार भडकला आणि त्याने गाडीतून उतरुन दीपक शर्माला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
दीपक शर्मांनी प्रविण कुमारला शिवीगाळ करु नका, असे सांगितल्यानंतर प्रविणचा पारा भडकला. त्याने दीपक शर्माला मारहाण केली आणि ६ वर्षीय यशवर्धनला धक्का देत जमिनीवर पाडले.
दरम्यान, दीपक शर्माची तपासणी केली असता, त्याचे बोट तुटल्याचे दिसून आले. पोलिसांनी प्रविण कुमार यांचाही जबाब नोंदवला आहे. रविवारी पुन्हा दोघांनाही पोलिसांनी बोलवलं आहे.
यापूर्वीही चुकीच्या कारणाने प्रविण कुमार चर्चेत आला होता. २००८ मध्ये त्याने मेरठ येथे डॉक्टराला मारहाण केली होती. तीन वर्षानंतर वेस्ट इंडीज दौऱ्यात तो प्रेक्षकाशी भांडला होता.
हेही वाचा - डायपरमध्ये क्रिकेटर.. पीटरसनने विराटला विचारलं, संघात घेणार का? मिळालं 'हे' उत्तर
हेही वाचा - IND Vs WI : नाणेफेक जिंकणाऱ्या पोलॉर्डच्या 'त्या' निर्णयावर विराट आनंदीत, म्हणाला मी...