नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफरने उत्तराखंडच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. संघ निवडीसंदर्भात सतत हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप जाफरने केला आहे. या कारणामुळे त्याने राजीनाम्याचे पाऊल उचलले. उत्तराखंड क्रिकेट असोसिएशननेही (सीएयू) जाफरचा राजीनामा स्वीकारला आहे. आगामी विजय हजारे कंरडक स्पर्धेपूर्वी जाफरने राजीनामा दिल्यामुळे उत्तराखंड संघाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. २० फेब्रुवारीपासून या स्पर्धेची सुरुवात होईल.
हेही वाचा - भारताच्या माजी 'वजनदार' खेळाडूकडे मुंबई संघाचे प्रशिक्षकपद
"मी खेळाडूंसाठी खरोखर दुःखी आहे. मला असे वाटते की त्यांच्याकडे बरीच क्षमता आहे आणि ते माझ्याकडून बरेच काही शिकू शकतात. परंतु पात्र नसलेल्या खेळाडूंच्या निवडीमुळे, निवड समिती आणि सचिवांच्या हस्तक्षेपामुळे आणि पक्षपातीपणामुळे ते संधीपासून वंचित राहत आहेत'', असे जाफरने असोसिएशनला पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.
सीएयूचे सचिव माहीम वर्मा यांनी जाफरचा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले, ''आम्ही जाफरची प्रत्येक मागणी पूर्ण केली आहे. एक महिनाभर शिबिराचे आयोजन करण्याव्यतिरिक्त, आम्ही त्याला बाहेरील खेळाडू, त्याच्या पसंतीच्या प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षकांची निवड करू दिली. पण निवड प्रकरणात त्याचा हस्तक्षेप खूप होत गेला. सय्यद मुश्ताक अली करंडकातील संघाच्या कामगिरीने आमच्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही. यानंतर निवडकर्त्यांना इतर काही खेळाडूंनी संधी द्यायची होती. मात्र, जाफरने स्वत:च्या निवडीवर जोर दिला.''
भारतासाठी ३१ कसोटी आणि २ एकदिवसीय सामने खेळलेल्या वसीम जाफरला गेल्या वर्षी मार्चमध्ये उत्तराखंड संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.