नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (डीडीसीए) इशारा दिला आहे. अरुण जेटली स्टेडियममधील स्टँड्सला दिलेले आपले नाव हटविण्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा बेदी यांनी डीडीसीएला दिला आहे. या स्टेडियममध्ये दिवंगत मंत्री अरुण जेटलींचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या निषेधार्थ बेदी यांनी बुधवारी ही विनंती केली होती.
हेही वाचा - 'या' कारनाम्यामुळे स्मिथ अश्विनला आयुष्यभर लक्षात ठेवेल!
अरुण जेटली हे १४ वर्षे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) अध्यक्ष होते, आता त्यांचा मुलगा रोहन जेटली सध्या हे पद सांभाळत आहेत. शनिवारी डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांना पाठवलेल्या पत्रात बेदी यांनी २३ डिसेंबर रोजी केलेल्या विनंतीची आठवण करून दिली आहे. त्यांच्या पत्राचे अद्याप उत्तर मिळाले नसल्यामुळे बेदी दुःखी आहेत.
१५ लाख आणि ८०० किलो -
या मैदानात जेटलींच्या ६८व्या जयंतीनिमित्त सहा फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. या निषेधार्थ बेदी यांनी डीडीसीएच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. जेटलींऐवजी एका महान खेळाडूचा पुतळा बसवला गेला पाहिजे, असे मत बेदींनी व्यक्त केले. गृहमंत्री अमित शाह स्वत: पुतळ्याचे अनावरण करणार असून या पुतळ्याची किंमत १५ लाख एवढी असून त्याचे वजन ८०० किलो आहे.