मुंबई - भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि इशान किशन हे दोघे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारतीय संघाकडून खेळतील, अशी भविष्यवाणी भारताचे माजी क्रिकेटर सबा करीम यांनी केली आहे. त्यांच्या मते, दोघेही मॅच विनर खेळाडू आहेत.
सबा करीम म्हणाले की, 'पंत आणि किशन या दोघांनी आपण मॅच विनर खेळाडू आहोत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वात आधी पंतने स्वत:ला सिद्ध केलं. यानंतर आता किशनला संधी मिळाली आहे. त्याचा देखील माईंडसेट तशाच आहे. माझ्या हिशोबाने भारतीय संघ खूप भाग्यशाली आहे. कारण त्यांच्याकडे समित षटकाच्या प्रकारात किशन आणि पंत सारखे खेळाडू आहेत. मला विश्वास आहे की, पंत आणि किशन क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताकडून खेळतील.'
सबा करीम यांच्या म्हणण्यानुसार, पंत आणि किशन या दोघांकडे आंतरराष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. हे दोन्ही खेळाडू २०१६ च्या अंडर-१९ विश्व करंडकात भारतीय संघाचे सदस्य होते. त्याचा यांना फायदा होत आहे.
दरम्यान, इशान किशनच्या नेतृत्वात भारतीय संघ २०१६ च्या अंडर-१९ विश्वकरंडकात अंतिम फेरीत पोहोचला होता. या स्पर्धेत पंतने मोलाची भूमिका निभावली होती. पण, या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा वेस्ट इंडीज संघाकडून पराभव झाला होता.
हेही वाचा - रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज:आफ्रिका लिजेड्सने बांगलादेशचा १० गडी राखून धुव्वा उडवत गाठली उपांत्य फेरी
हेही वाचा - Ind vs Eng : कोण मारणार बाजी?, आघाडी घेण्यास दोन्ही संघ उत्सुक