लंडन - तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर इंग्लंड आणि विंडीज मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. या दोन संघात 8 जुलैपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार असून क्रिकेटप्रेमींना बऱ्याच दिवसानंतर घरी बसून क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे.
या मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने 13 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. हा कसोटी सामना एजेस बाऊलवर रंगेल. जो रूटच्या अनुपस्थित बेन स्टोक्स संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. यासह स्टोक्स हा इंग्लंडचा 81 वा कसोटी कर्णधार असेल.
सामन्यासाठी नऊ राखीव खेळाडू मैदानावर हजर असतील. यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो आणि अष्टपैलू खेळाडू मोईन अली यांना संघात स्थान मिळालेले नाही. या सामन्यात दोन्ही संघ 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर' च्या लोगोसह मैदानात उतरतील.
उभय संघात ही मालिका विनाप्रेक्षक खेळण्यात येणार आहेत. पहिला सामना 8 जुलैला साऊथम्पटन येथे खेळला जाईल. दुसरा 16 ते 20 जुलै दरम्यान आणि तिसरा 24 ते 28 जुलै या काळात खेळवण्यात येणार आहे. हे दोन्ही सामने ओल्ड ट्रँफर्ड मैदानात खेळले जाणार आहेत. दरम्यान, खेळाडूंची राहण्याची व्यवस्था स्टेडियममध्ये किंवा त्यांच्या जवळपास असलेल्या हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
इंग्लंड संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, रोरी बर्न्स, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर (यष्टीरक्षक), जॅक क्रोली, जोए डन्ली, ओली पोप, डॉम सिब्ली, मार्क वूड, ख्रिस वॉक्स.
राखीव : जेम्स ब्रेस, सॅम कुर्रान, बेन फॉक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, साकीब महमूदू, क्रेग ओव्हरटन, ऑली रॉबिन्सन, ओली स्टोन.