ब्रिस्टल - सलामीवीर इमाम-उल-हकच्या १५१ धावांच्या दिडशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडसमोर ३५८ धावांचा डोंगर रचलाय. खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत पाकला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.
![इमाम-उल-हक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3283273_ddd.jpg)
पाकिस्तानच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर फखर झामन २ धावांवर माघारी गेला तर त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला बाबर आझमही १५ धावांमध्ये स्वस्तात माघारी परतला. मात्र यानंतर इमाम-उल-हकने हॅरिस सोहेल आणि आसिफ अलीसोबत चांगली भागीदारी करत पाकिस्तान मोठ्या धावसंख्येकडे नेले. पाकसाठी सोहेलने ४१ तर आसिफने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली.
इमामने १३१ चेंडूचा सामना करताना १६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १५१ धावांची शानदार खेळी केली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील इमामची ही वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.
इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक ४, टॉम कुरनने २ तर डेव्हिड विली, लियाम प्लंकेट यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. ५ एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेत खेळण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा १२ धावांनी पराभव करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.