नॉटिंगहॅम - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशचा ४८ धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे ३८२ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या बांग्लादेशने निर्धारीत ५० षटकात ८ बाद ३३३ धावा केल्या. बांगलादेशच्या संघाने आश्वासक पद्धतीने गोलंदाजांचा सामना केला, मात्र मोक्याच्या क्षणी गमावलेल्या विकेट आणि योग्य धावगती न राखता आल्यामुळे कांगारुंनी सामन्यात बाजी मारली. बांगलादेशकडून यष्टीरक्षक मुश्फिकूर रहिमने नाबाद शतकी खेळी केली. मात्र, तोही संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत सलामीवीर डेव्हिड वार्नरच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर ३८१ धावांचा डोंगर उभारला होता. याला प्रत्युत्तर देताना बांगलादेशने आश्वासक सावध सुरुवात केली. मात्र मोक्याच्या क्षणी विकेट गेल्याने बांग्लादेशचा संघ ५० षटकात ८ बाद ३३३ धावा करु शकला.
डेव्हिड वार्नरने बांगलादेशच्या गोलंदाजीचे पिसे काढत १४७ चेंडूत १६६ धावा चोपल्या. त्याने या खेळीत १४ चौकारांसह ५ षटकार लगावले. या सामन्यात उस्मान ख्वाजाने ८९ धावा, कर्णधार अॅरोन फिंच याने ५३ धावा केल्या. मात्र, वार्नरच्या वादळापुढे बांगलादेशचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. या विश्वकरंडक स्पर्धेतील डेव्हिड वार्नरचे हे दुसरे शतक ठरले आहे.