नवी दिल्ली - बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यासाठी पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर दानिश कनेरियाने पाठिंबा दर्शवला आहे. गांगुली अध्यक्ष झाला तर, आजीवन बंदीविरोधात अपील करणार असल्याचे कनेरियाने सांगितले.
कनेरिया म्हणाला, "मी गांगुलीकडे अपील करेन आणि मला खात्री आहे, की आयसीसी मला सर्व प्रकारे मदत करेल. सौरभ गांगुली एक उत्तम क्रिकेटपटू आहे. त्याला बारकावे समजतात. आयसीसी अध्यक्षाच्या भूमिकेसाठी त्याच्यापेक्षा चांगला कोणताही उमेदवार नाही."
तो म्हणाला, ''गांगुलीने कर्णधारपदी भारतीय संघाचे तेजस्वी नेतृत्व केले आणि त्यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलीनेही चांगली कामगिरी केली. तो सध्या बीसीसीआय अध्यक्ष आहेत आणि मला विश्वास आहे, की तो क्रिकेटला पुढे नेऊ शकेल, तो आयसीसीचा प्रमुख होईल."
दानिश कनेरिया पाकिस्तानच्या संघाकडून खेळणारा दुसरा हिंदू खेळाडू असून त्याचे मामा अनिल दलपत हेही पाकिस्तानच्या संघात खेळले होते. दानिश कनेरियाने 61 कसोटी आणि 18 एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने कसोटीत 261 तर एकदिवसीय सामन्यांत 15 बळी घेतले.