मुंबई - चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू सुरैश रैनाने आयपीएलमधून माघार घेत भारतात परतणे पसंद केले. तो व्यक्तिगत कारणाने स्पर्धेतून माघार घेतल्याचे बोलले जात आहे. अशात सोमवारी सीएसकेचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी रैनाच्या डोक्यात यश गेले आणि तो ११ कोटी रुपये सोडून भारतात परतला, असे वक्तव्य केले होते. यामुळे रैनासाठी सीएसकेची दारे कायमची बंद झाली, अशा चर्चांना ऊत आला होता. श्रीनिवासन यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा केला आहे.
श्रीनिवासन म्हणाले की, 'माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला. चेन्नई संघात रैनाचे योगदान दुसऱ्या क्रमांकाचे नाही. मला वाईट वाटतं की, या गोष्टीचा लोक चुकीचा अर्थ काढत आहेत. चेन्नई संघात रैनाचे योगदान प्रत्येक वर्षी शानदार राहिले आहे. आता आपल्याला हे समजून घेणे गरजेच आहे की, रैना कोणत्या परिस्थितीत आहे आणि त्याला वेळ देणे गरजेचे आहे.'
सुरेश रैना शानदार खेळाडू आहे. त्याच्यासोबत सीएसकेचा संघ नेहमी उभा आहे. या अवघड दिवसात रैनाला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, असेही श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रैना २००८ सालापासून सीएसकेचा खेळाडू आहे.
काय म्हणाले होते श्रीनिवासन -
रैनाच्या डोक्यात यश गेले आहे. रैनाच्या आयपीएल सोडण्यावर अनेक चर्चा सुरू होत्या. त्यापैकी एक म्हणजे संघातील २ खेळाडूंसह १३ जणांना कोरोनाची लागण झाल्याने तो घाबरला होता. त्या कारणानेच त्याने संघ सोडण्याचा निर्णय घेतला. दुसरे कारण म्हणजे रैनाला हॉटेलमधील रूम खराब मिळाली होती. आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात झालेली नाही. पण आम्हाला रैनाची कमी नक्कीच जाणवेल. तो परत यावा अशी इच्छा आहे. त्याला याची कल्पना नक्कीच असेल की तो ११ कोटी रुपये सोडून गेला आहे, असे वक्तव्य श्रीनिवासन यांनी सुरेश रैना बाबत केलं होतं.
हेही वाचा - IPL २०२० : धोनीनंतर विराटच्या संघाला मोठा धक्का, महत्वाच्या खेळाडूची स्पर्धेतून माघार