मेलबर्न - जागतिक साथीच्या कोरोना व्हायरसमुळे गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केव्हिन रॉबर्ट्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हंगामी मुख्य कार्यकारी म्हणून निक हॉकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी, सोमवारी ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाच्या सदस्यांची रविवारी बैठक झाली. त्यामध्ये रॉबर्ट्स यांना हटवण्यावर चर्चा झाली. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन दरम्यान रॉबर्ट्स यांच्या कृतीबद्दल बोर्ड सदस्य संतप्त आहेत.
कोरोनामुळे रॉबर्ट्स यांनी 80 टक्के कर्मचार्यांना एप्रिल महिन्यात दीर्घ रजेवर पाठवले होते. या निर्णयाबद्दल रॉबर्ट्स यांच्यावर सतत टीका केली जात होती. ऑस्ट्रेलियाच्या विविध प्रांतांच्या क्रिकेट संघटनांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये सदस्य नेमले. या क्रिकेट असोसिएशननेही फंडात कपात करण्याच्या बोर्डाच्या प्रस्तावावर टीका केली आहे.
राजीनामा देताना रॉबर्ट्स म्हणाले, "या खेळाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आभारी आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ हे पद मला आवडले. आमचे कर्मचारी आणि खेळाडू विलक्षण लोक आहेत. ज्यांनी या खेळासाठी बरेच काम केले आहे. आम्ही एकत्र काय साध्य केले याचा मला अभिमान आहे.''