मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जागतिक व्यवहारासह क्रीडा स्पर्धाही ठप्प आहेत. अशा परिस्थितीमध्ये आधी देश महत्वाचा आहे. आयपीएल नंतर पाहता येईल. देश थांबला असताना सद्या आयपीएलसंदर्भात कुणीही बोलायला नको, असे मत भारतीय सलामीवीर रोहित शर्माने व्यक्त केले आहे. फिरकीपटू युझवेंद्र चहलने इन्स्टाग्राम लाईव्ह चॅट दरम्यान रोहित शर्माला आयपीएलच्या भवितव्याबद्दल प्रश्न विचारला असता, त्याने मत व्यक्त केलं.
तो म्हणाला, 'माझ्या मते आपण सर्वात आधी देशाचा विचार करायला हवा. सर्वात आधी परिस्थिती नियंत्रणात येणे गरजेचे आहे, त्यानंतर आपण आयपीएलबद्दल बोलू शकतो. सर्वात आधी देशाचा विचार व्हावा. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आयपीएलचा विचार करता येईल.'
सद्या आपली कोरोनावर नियंत्रण मिळविण्याची धडपड सुरू आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या ७२५ वर पोहोचली आहे. तर १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जगात मरणाऱ्यांची संख्या २२ हजारांवर गेली असून भारत बंदमुळे अनेक महानगरांतील जनजीवन ढवळून निघाले आहे. मी अशी मुंबई कधीही पाहिलेली नाही. क्रिकेटपटू या नात्याने आम्हाला नेहमी बाहेर राहावे लागते. सध्या विपरीत परिस्थिती असली तरी कुटुंबीयांसोबत वेळ घालवायला मिळत असल्याचे रोहित म्हणाला.
दरम्यान, बीसीसीआयने कोरोनाच्या धोक्यामुळे २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीशी सामना करण्यासाठी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार आहे. सद्य परिस्थिती पाहता, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. यामुळे आयपीएल स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट आहे. याबाबतचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
हेही वाचा - मजेदार फोटो शेअर करत अश्विनचे भारतीयांना घरी राहण्याचे आवाहन
हेही वाचा - “धोनीला टी-२० वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळणार”