मुंबई - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. धर्मशाळामध्ये आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली होती. यामुळे संध्याकाळी साडेपाच वाजता बीसीसीआयने सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. मालिकेतील दुसरा सामना १५ मार्चला लखनौ येथे होईल. त्यानंतर १८ मार्चला कोलकाता येथे अखेरचा सामना होणार आहे. पण, या सामन्यात कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला जाणार नाही. याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, कोलकाताच्या सामन्याची तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे.
कोरोनाच्या धोक्यामुळे क्रीडा मंत्रालयाने एखादी क्रीडा स्पर्धा पुढे ढकलणे शक्य नसेल, तर ती स्पर्धा प्रेक्षकांशिवाय घ्यावी, असा सल्ला दिला आहे. यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे पुढील दोन सामने प्रेक्षकांविनाच खेळवण्यात येईल, अशी शक्यता आहे. जर असे झाल्यास क्रिकेटच्या इतिहासात हा प्रेक्षकांविना झालेला पहिला सामना ठरेल.
दरम्यान, कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. चीनमधून जगभरात फैलाव झालेल्या या विषाणूमुळे ४ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगातील १०० हून अधिक देशात याचा प्रसाह झाला आहे. भारतात ७० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. या विषाणूचा धोका लक्षात घेता बीसीसीआय प्रेक्षकांविना सामना खेळवण्याच्या विचारात आहे.
कोरोनामुळे चीनमधील सर्व स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच चीनी खेळाडूंना भारतासह अनेक देशांनी स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. जुलै महिन्यात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धाही कोरोनामुळे संकटात सापडलेली आहे. तर आयपीएलवरही टांगती तलवार आहे.
हेही वाचा - BCCI ची कोंडी, IPL २०२० विषयावर उच्च न्यायालयाने दिले 'हे' आदेश
हेही वाचा - IPL घेऊ नका, परराष्ट्र मंत्रालयाचा BCCI ला सल्ला