कोलकाता - ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवसाच्या तिकिटांचे पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) याबाबत माहिती दिली. भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळवलेला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना तिसर्या दिवशी संपला. या सामन्यात भारताने एक डाव आणि ४६ धावांनी विजय मिळवला आहे.
हेही वाचा - वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला वर्णद्वेषी वागणूक, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मागितली माफी
सीएबीने एका निवेदनात म्हटले आहे की, 'चौथ्या आणि पाचव्या दिवसाच्या तिकिटांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे. ज्यांनी या दोन दिवसांसाठी तिकिटे बुक केली होती, त्यांनी त्यांना पैसे पाठविण्याची माहिती मोबाईलवर संदेशाद्वारे दिली जाईल.' सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांची सर्व तिकिटे विकली गेली होती. सीएबीने आपल्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
या विजयासह भारतीय संघाने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने निर्भेळ यश मिळवले. बांगलादेश विरुध्दच्या मालिकेनंतर भारतीय संघाचे आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील स्थान अधिक बळकट झाले आहे. भारत सध्या ३६० गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.