नवी दिल्ली - टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक एका अडचणीत सापडला आहे. कॅरेबियन प्रिमिअर लीगच्या (सीपीएल) एका इवेंटला हजर राहिल्यामुळे बीसीसीआयने कार्तिकला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
हेही वाचा - जवळपास संपूर्ण संघाला तंबूत पाठवणाऱ्या पाकिस्तानच्या 'या' माजी फिरकीपटूचे निधन
या लीगमधील त्रिनबागो नाइट राइडर्सच्या प्रमोशनल इवेंटमध्ये कार्तिक दिसून आला होता. ३४ वर्षीय दिनेश कार्तिकला या संघाच्या जर्सीसोबत ड्रेसिंग रुममध्ये पाहण्यात आले. त्रिनबागो संघाचा हा सलामीचा सामना होता. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सेंट किट्स अँड नेविसविरुद्ध हा सामना होता.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले, 'बीसीसीआयने कार्तिकला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आम्हाला फोटो मिळाले आहेत त्यामध्ये तो संघाच्या जर्सीसोबत ड्रेसिंग रुममध्ये आहे.' त्रिनबागो नाइट राइडर्स हा संघ अभिनेता शाहरुख खानच्या मालकीचा आहे. 'दिनेश कार्तिक एक व्यावसायिक क्रिकेटर असून आयपीएलशिवाय त्याला अन्य स्पर्धेत खेळता येऊ शकत नाही', असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.