बंगळुरु - चिन्नास्वामी स्टेडियम येथे सुरू असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बंगळुरूच्या संघापुढे १८८ धावांचे आव्हान दिले आहे. बंगळुरूच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने मुंबईने २० षटकात ८ बाद १८७ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सचा संघ युझवेंद्र चहलच्या फिरकी जाळ्यात अडकला. त्याने ३८ धावा देत महत्वपूर्ण ४ बळी घेतले.
विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईची सलामी जोडी रोहित-डी कॉक यांनी बंगळुरूच्या गोलंदाजांवर हल्ला केला. त्यांनी ५४ धावांची सलामी दिली. रोहित शर्माने ३३ चेंडूत ४८ धावा केल्या. त्याचे अर्धशतक २ धावांनी हुकले. त्यात १ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. डी कॉकने २० चेंडूत २३ तर युवराज सिंगने १२ चेंडूत २३ धावांचे योगदान दिले.
युवराज चहलच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात बाद झाला. सूर्यकुमार यादवने झटपट ३८ धावा झोडपून काढल्या. त्यानंतर किरोन पोलार्ड आणि कृणाल पंड्या यांनी चाहत्यांना निराशा केली. हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकात सिराजला २ षटकार खेचत मुंबईची धावगती वाढवली. पंड्याने १४ चेंडूत ३ षटकारांसह ३२ धावा कुटल्या.
बंगळुरूकडून उमेश यादवने भेदक मारा करत मुंबईच्या २ फलंदाजांना बाद केले. मोहम्मद सिराजने २ गडी बाद करत सुरेख साथ दिली. नवदीप सैनी आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांना एकही गडी टिपता आला नाही.