लंडन - अॅशेस मालिकेच्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियापुढे ३९९ धावांचे आव्हान दिले आहे. जो डेन्ली (९४) आणि बेन स्टोक्स (६७) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या डावात ३२९ धावा केल्या.
हेही वाचा - अॅशेस मालिका - डेन्लीचे शतक हुकले, तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडकडे ३८२ धावांची आघाडी
ऑस्ट्रेलियाने या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली असून हा शेवटचा सामना जिंकून इतिहास रचण्याच्या प्रयत्नात ऑस्ट्रेलियाचा संघ असणार आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी आतूर आहे.
दरम्यान, ६९ धावांची बढत घेतलेला इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावामध्ये ३२९ धावांवर आटोपला. दोन्ही डावातील बढत मिळून ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी ३९९ धावा कराव्या लागणार आहेत. अद्याप या सामन्याचे दोन दिवस शिल्लक असल्याने हा सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने जरी हा सामना ड्रॉ केला तरी, ते मालिका २-१ जिंकतील.
हेही वाचा - टी-20 क्रिकेटमधे नवीन करिश्मा; 'या' दोन फलंदाजांनी सलग 7 चेंडूत ठोकले 7 षटकार
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंड संघाची धावसंख्या ८ बाद ३१३ अशी होती. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला इंग्लंडचा डाव २७ चेंडूत आटोपला. इंग्लंडचे राहिलेले २ गड्यांनी १६ धावांची भर घातली. दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात २९४ धावा केल्या. त्यावर ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डाव २२५ धावांवर आटोपला होता.
फक्त एकदाच ३९० पार करत ऑस्ट्रेलिया जिंकली -
ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यंतच्या इतिहासात फक्त एकदाच ३९० पार धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या संघाने तब्बल ५१ वेळा ३९० पार धावांचा पाठलाग केला आहे. यात त्यांना ३७ वेळा पराभूत व्हावे लागले आहेत. तर १३ सामने अनिर्णित राहिले आहेत. फक्त एकदाच ऑस्ट्रेलियाने ३९० पार धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. १९४८ मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात ४०४ धावांचा यशस्वी पाठलाग करत सामना जिंकला होता.