चेन्नई - भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे दोघे आमच्या संघाचे एक्स फॅक्टर खेळाडू आहेत, असे इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने सांगितले.
बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर या दोघांना श्रीलंका दौऱ्यात आराम देण्यात आला होता. तर रोरी बर्न्सने वैयक्तिक कारणास्तव श्रीलंका दौऱ्यातून माघार घेतली होती. तिघांची निवड भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत करण्यात आली आहे. इंग्लंडचा संघ भारतात पोहचण्याआधी तिघेही चेन्नईत दाखल झाले होते. त्यांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्याने, त्यांना सरावासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे तिघांनी शनिवारी सराव केला.
जोस बटलरने माध्यमाशी बोलताना सांगितले की, जोफ्रा आर्चर निश्चित रुपाने एक एक्स फॅक्टर खेळाडू आहे. तो भारतात मालिका खेळण्यासाठी उत्सुक असेल.
मला वाटते की, आमच्याकडे असे खेळाडू आहेत जे गोलंदाजीत शानदार कामगिरी करू शकतात. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्राँड हे सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाज लयीत आहेत. जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स हे एक्स फॅक्टर खेळाडू आहेत, असेही बटलरने सांगितले.
दरम्यान, उभय संघातील मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - बुमराहने केली कुंबळेच्या गोलंदाजीची नकल, चेंडू वळला झपकन; पाहा व्हिडिओ
हेही वाचा - मुश्ताक अली टी-२० फायनल : बडोदा-तामिळनाडू जेतेपदासाठी झुंजणार