नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने कोरोना व्हायरस विरूद्धच्या लढ्यासाठी पंतप्रधान मदत निधी आणि कर्नाटक राज्य मदत निधीत देणगी दिली आहे. कुंबळेने किती मदत दिली, हे स्पष्ट केले नाही.
कोरोनाला पराभूत करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने लढा द्यावा. मी पंतप्रधान मदत निधी आणि मुख्यमंत्री (कर्नाटक) मदत निधीमध्ये हातभार लावला आहे. कृपया घरी राहा आणि सुरक्षित राहा, असे कुंबळेने ट्विटमध्ये म्हटले.
तत्पूर्वी, भारतीय फलंदाज रोहित शर्माने ८० लाखाची मदत दिली आहे. रोहितने पंतप्रधान रिलीफ फंड, मुख्यमंत्री रिलीफ फंड, झोमॅटो फिडिंग इंडिया आणि स्ट्रे डॉग्स या संस्थांना देणगी दिली आहे. तर, सचिन तेंडुलकरने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रत्येकी २५ लाखांची मदत केली आहे. याशिवाय भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने ५२ लाखांची मदत केली आहे. यापैकी ३१ लाख हे पंतप्रधान सहाय्यता निधीत, तर २१ लाख उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जाणार आहेत. अजिंक्य रहाणेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १० लाखांची मदत केली आहे.