चेन्नई - भारतीय संघाचा फिरकीपटू अक्षर पटेल दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकला होता. त्याच्या जागेवर शाहबाद नदीमला संघात खेळण्याची संधी मिळाली. पण तो महागडा ठरला. आता अक्षर पटेल दुखापतीतून सावरला असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
अक्षर पटेलच्या गुडघ्याला सराव सत्रादरम्यान, किरकोळ दुखापत झाली होती. यामुळे तो पहिली कसोटी खेळू शकला नाही. त्याच्या जागेवर शाहबाज नदीमला संधी मिळाली. पण तो महागडा ठरला. त्याने दोन्ही डावात मिळून २३३ धावा दिल्या. यात त्याने तीन गडी बाद केले. याशिवाय तो फलंदाजीत दोन्ही डावात शून्यावर बाद झाला. त्याच्या या कामगिरीनंतर, नदीमच्या जागेवर कुलदीप यादवला का संधी दिली गेली नाही, असा सवाल चाहत्यांनी उपस्थित केला.
आता अक्षर पटेल दुखापतीतून सावरला असल्याची माहिती मिळत असून तो दुसऱ्या कसोटीत खेळण्याची दाट शक्यता आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. यातील पहिला सामना इंग्लंड संघाने २२७ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता उभय संघातील दुसऱ्या सामन्याला चेन्नईतच १३ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे.
हेही वाचा - IND VS ENG : जडेजा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर
हेही वाचा - Ind vs Eng : 'दुसरा सामना हरल्यास विराटने कर्णधारपद सोडून द्यायला हवे'