लखनौ - सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतून भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने माघार घेतली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी विश्व विजेती पी. व्ही. सिंधूनेही या स्पर्धेतून माघार घेतली आहे. आता महिला एकेरीत भारताची मदार मुग्धा अग्रेय हिच्यावर आहे. पुरुष गटातून युवा खेळाडू लक्ष्य सेनच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
सायना नेहवाल सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. मागील सहा स्पर्धेत तिचे आव्हान पहिल्या फेरीत संपुष्टात आले आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर सायनाला विजयी लय अद्याप मिळालेली नाही. ती लय सायना सय्यद मोदी स्पर्धेत मिळवेल, असे बोलले जात होते. मात्र, स्पर्धा सुरू होण्याच्या काही तास आधी सायनाने या स्पर्धेतून माघार घेतली.
महिला एकेरीत सिंधू आणि सायना यांच्या माघारीनंतर भारताची मदार मुग्धा अग्रेयवर आहे. पुरुष एकेरीत भारताकडून लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, गतविजेता समीर वर्मा आणि जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता साई प्रणितही खेळणार आहेत. दुहेरीत भारताची जोडी सात्विक साईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्यावर मदार असणार आहे.
हेही वाचा - बॅडमिंटनपटू साई प्रणीतचा पार पडला साखरपुडा, ८ डिसेंबरला होणार लग्न
हेही वाचा - सायनाने शेअर केला आपल्या बायोपिकचा 'फर्स्ट लुक', परिणीतीला दिल्या शुभेच्छा!