क्वालालंपूर - जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेली भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालला मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवासह सायनाचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.
बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत २१ व्या क्रमांकावर असलेल्या यजमान थायलंडच्या पोर्नपावी चोचूवाँगने ५४ मिनीटे चाललेल्या या सामन्यात सायनावर २०-२२, २१-१५, २१-१० ने मात करत स्पर्धेतील दुसरी फेरी गाठली. मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला स्पर्धेचे जेतेपद मिळवता आलेले नाही.
या स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात एचएस प्रणॉयला आणि समीर वर्माला पराभवाचा धक्का बसल्याने यापूर्वीच ते स्पर्धेबाहेर पडले आहेत. त्यामुळे भारताची सर्व मदार पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांच्यावर आहे. या दोन्ही खेळाडूंना स्पर्धेतील दुसरी फेरी गाठण्यात यश आले आहे.