नवी दिल्ली - भारताचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, पारूपल्ली कश्यप, आणि बी. साईप्रणीतने जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) आगामी वेळापत्रकावर टीका केली. बीडब्ल्यूएफने पाच महिन्यांत 22 स्पर्धा जाहीर केल्या असल्याने या बॅडमिंटनपटूंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या कोरोनाच्या उद्रेकामुळे सर्वजण घरी आहेत. त्यामुळे सरावाला योग्य वेळ मिळाला नसल्याचे या बॅडमिंटनपटूंनी सांगितले. कश्यपने ट्विटरवर लिहिले, "पाच महिन्यांतच 22 स्पर्धा. पहिली गोष्ट म्हणजे सराव अद्याप सुरू झालेला नाही." त्यावेळी एचएस प्रणॉयने कश्यपच्या ट्विटला उत्तर दिले, "आणखी वाढवून 25 स्पर्धा घेता आल्या असत्या. चांगले काम."
त्यानंतर, बी साईप्रणीत म्हणाला, "लोक कमी प्रवास करण्याबद्दल बोलत आहेत आणि आम्ही अधिक प्रवासाबद्दल बोलत आहोत." याशिवाय टेनिसकडे ऑक्टोबरपर्यंत कोणताही कार्यक्रम नियोजित नसल्याचे सायना नेहवालने म्हटले. "पाच महिने न थांबलेला प्रवास. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कोरोनाच्या वेळी प्रवासाच्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांचे काय झाले?"
बीडब्ल्यूएफने शुक्रवारी नवीन वेळापत्रक खेळाडूंसमोर आणले आहे. यामध्ये 8 ते 13 डिसेंबर दरम्यान इंडिया ओपन ही ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी ही स्पर्धा नवी दिल्ली येथे खेळली जाईल. यापूर्वी ही स्पर्धा 24 ते 29 मार्च दरम्यान खेळवली जाणार होती. पण कोरोनाव्हायरसमुळे ही स्पर्धा तहकूब झाली.
थॉमस अँड उबर चषक 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान डेनमार्कच्या आरुषस येथे होईल, असे बीडब्ल्यूएफने सांगितले आहे. कोरोनामुळे मार्चपासून 10 हून अधिक बॅडमिंटन स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.