बर्मिंगहॅम - दुसऱ्या मानांकित जपानची बॅडमिंटनपटू नोझोमी ओहुहारा हिने ऑल इंग्लंड स्पर्धेचे महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात ओकुहाराने थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचुवोंगचा ४४ मिनिटे रंगलेल्या सामन्यात २१-१२, २१-१६ असा पराभव केला. ओकुहाराने याआधी २०१६ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
विजयानंतर ओकुहाराने सांगितलं की, 'ऑल इंग्लंड स्पर्धेचे पुन्हा एकदा विजेतेपद पटकावल्यानंतर आनंद होत आहे. साखळी सामन्याप्रमाणेच मी अंतिम सामन्यात देखील खेळू इच्छित होते. माझा प्रयत्न चांगले शॉट्स खेळणे होता. यात मी यशस्वी ठरले. चोचुवोंग प्रथमच ऑल इंग्लंड स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. यामुळे ती दबावात होती, असे मला वाटतं.'
पाच वर्षानंतर पुन्हा एकदा मी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पण माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. मी माझ्या कामगिरीवर आनंदी आहे, असे देखील ओकुहाराने सांगितले.
सिंधू उपांत्य फेरीत पराभूत -
गत विश्व चॅम्पियन पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यफेरीत पराभव स्वीकारावा लागला. महिला एकेरीत थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचुवोंगने सिंधूचा पराभव केला. ४३ मिनिटे रंगलेल्या सामन्यात सिंधूला १७-२१, ९-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.
हेही वाचा - बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात
हेही वाचा - सिंधुने 'या' कारणामुळे सोडली गोपीचंद बॅडमिंटन अकादमी