झी मराठी वाहिनीवर ‘मन झालं बाजिंद’ ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेत राया आणि कृष्णाची एक अनोखी प्रेम कथा दाखवण्यात येणार आहे. पण मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक मात्र बुचकळ्यात पडले आहेत. त्यांना मालिकेच्या नावातील ‘बाजिंद’ या शब्दाचा अर्थ मात्र माहिती नाहीये. उभा महाराष्ट्र गुगलवर ‘बाजिंद’ या नावाचा नेमका अर्थ काय? हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
‘मन झालं बाजिंद’ या मालिकेचा प्रोमो २९ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आला. बघता बघता या नव्या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. पण प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षक गुगलवर ‘बाजिंद’ शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘बाजिंद अर्थ’, ‘बाजिंद Meaning’, ‘बाजिंदचा अर्थ’, ‘बाजिंद म्हणजे काय?’, ‘बाजिंदी अर्थ’ या टर्म्स गुगल सर्चच्या ट्रेण्डमध्ये दिसून येत आहेत.
सायंकाळी म्हणजेच जेव्हा सर्वजण टीव्हीसमोर बसून आपल्या आवडत्या मालिका पाहत असतात तेव्हापासून ‘बाजिंद’ शब्दाबद्दलचा सर्च वाढताना दिसतो. सामान्यपणे पुढील चार तासांमध्ये म्हणजेच रात्री साडेअकरापर्यंत सर्चचे हे प्रमाण वाढतच जाते. साडेअकराला सर्वाधिक लोक ‘बाजिंद’बद्दल सर्च करत असतात. विशेष म्हणजे त्यानंतर ‘बाजिंद’बद्दलच्या सर्चमध्ये पुन्हा घट होते आणि पुन्हा पुढील दिवशी साडेसातच्या आत हा सर्च ग्राफ वर गेलेला पहायला मिळतो. म्हणजेच जेव्हा जेव्हा मालिका बघताना जाहिरात लागते तेव्हा लोक ‘बाजिंद’चा अर्थ काय आहे हे गुगलवर सर्च करताना दिसतात.
‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत बाजिंद हा शब्द मालिकेतील नायक रायासाठी वापरण्यात आला आहे. या शब्दाचा अर्थ इथे जिद्दी असा होतो. मालिकेत राया हा अतिशय जिद्दी दाखवण्यात येणार आहे. परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, त्याच्या कामाचा पसाराही मोठा आहे, असा बाजिंद नायक राया आहे. तर मालिकेतील नायिका कृष्णा ही मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी दाखवण्यात येणार आहे.
‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत पहिल्यांदाच राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहे. पिवळा रंग हे बुद्धीचं प्रतीक. हा मांगल्याचा, समृद्धीचा रंग आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पिवळ्या रंगाच्या हळदीला मान असतो. आत्मविश्वासनिर्माण करणारा हा रंग आपलं मनसुद्धा पवित्र करतो. या पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची प्रेमकहाणी फुलणार आहे. या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केलेले असून वाघोबा प्रॉडक्शन यांनी या मालिकेच्या निर्मीतीची धुरा सांभाळली आहे.
हेही वाचा - ‘न्यूड’ लाईव्ह करणाऱ्या गहना वशिष्ठची खास मुलाखत, सांगितला 'पॉर्न' आणि 'इरॉटिका'मधील फर