'फक्त मराठी' या मराठी वाहिनीवर सिंधू ही नवी मालिका सुरू झाली आहे. अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या चिमुरड्या 'सिंधू'चा आता विवाह होणार आहे. एकोणिसाव्या शतकातील घटकांवर आधारीत ही मालिका असल्याने हा बालविवाह आहे. देवव्रतशी लग्न होत असल्याने सिंधूच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. यानिमित्त फक्त मराठीची नवनिर्मिती असलेल्या 'सिंधू..एका सामान्य मुलीची असामान्य कथा' या मालिकेच्या सेटवर लगीनघाई सुरू झालीय.
अष्टपुत्रे यांची कन्या असलेली सिंधू आता रानडे यांची सून होणार आहे. त्यानुसार मालिकेच्या ट्रॅकमध्ये आता देवव्रताची सोडमुंज, देव प्रतिष्ठा, हळदी असा सगळा लग्न सोहळ्याचा तामझाम बघायला मिळेल. अर्थातच त्याला एकोणिसाव्या शतकाचा बाज असेल. त्यासाठी खास प्रॉपर्टी, साड्या, दागिने अशी सगळी तयारी करण्यात आली आहे. सिंधूच्या प्रमुख भूमिकेतील अदिती जलतारे आणि देवव्रत साकारत असलेला श्रीहरी अभ्यंकर हे दोन्ही बालकलाकार त्यांचे अभिनय कौशल्य दाखवत आहेत. एकूणच गौरी किरण, मेघा मटकर, प्रभाकर वर्तक, शाश्वती पिंपळीकर, पूजा मिठबावकर आणि संपूर्ण स्टारकास्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
खरे तर कोवळ्या वयात विवाहबंधनात अडकत असल्याने सिंधू असो वा देवव्रत दोघांनाही नेमके लग्न म्हणजे काय याची विशेष कल्पना नाही. मात्र आता यापुढे धाकटी आई भामिनीच्या जाचातून सिंधूची सुटका होईल, अशी सगळ्यांना आशा आहे. आता यापुढे सिंधूच्या आयुष्यात नेमके काय काय घडेल हे जाणून घेण्यासाठी बघत रहा 'सिंधू' रोज रात्री ८ वाजता फक्त मराठीवर!
'फक्त मराठी'चे बिझनेस हेड श्याम मळेकर सांगतात, 'आजवर आम्ही चोवीस तास उत्तमोत्तम मराठी सिनेमा दाखवणारी वाहिनी होतो. आता मात्र, या नवनिर्मितीच्या माध्यमातून आम्ही उत्तमोत्तम मालिकाही प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. सिंधूची कथा सर्ववयोगटातील प्रेक्षकांना नक्की भिडेल असा मला विश्वास आहे. अल्पावधीतच दोन्ही शोज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. येत्या काळात आणखीनही काही नवीन शोज या वाहिनीवर बघायला मिळतील.’