पुणे - काही दिवसांपूर्वी रस्त्यावर लाठ्या-काठ्या खेळणाऱ्या शांताबाई पवार या 85 वर्षीय आजींचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना 'वॉरियर आजी' अशी ओळख मिळाली होती. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आजींना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अभिनेता सोनू सूदनेही आजींसाठी ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानुसार सोनू सूदने आपला शब्द पाळला असून हे ट्रेनिंग सेंटर लवकरच सुरू होणार आहे.
गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर येत्या 22 तारखेला याचा श्रीगणेशा होणार आहे. निर्मिती' या संस्थेने ट्विटरवरून ही माहिती दिली. संस्थेच्या सदस्यांनी शांताबाई पवार यांच्या सोबतचा एक फोटोही ट्विटरवर शेअर करीत ही माहिती दिली. "आज निर्मिती परिवारातील सदस्यांनी #Warrior_aaji यांची भेट घेतली. शब्द दिल्याप्रमाणे त्यांचे क्लास सुरू करण्याचे स्वप्न "निर्मिती फाऊंडेशन" येणाऱ्या बावीस ऑगस्टला सत्यात उतरवत आहे. सोनू सूद यांची मोलाची मदत मिळाली असून लवकरच आजीचे हक्काचे व्यासपीठ त्यांना मिळणार आहे" असे त्यात म्हटले आहे.
आजींचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोनू सूदने ट्विटरवरून आजींविषयी माहिती विचारली होती. आजींचे काही तपशील मिळू शकतील का? त्यांच्याबरोबर एक प्रशिक्षण शाळा सुरू करायची आहे. तिथे त्या महिलांना आत्मसंरक्षणाचे धडे देतील, असे ट्विटमध्ये म्हटले होते.
हेही वाचा - दिलीप कुमार यांचे दोन्ही भाऊ कोरोना 'पॉझिटिव्ह', श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं व्हेंटिलेटरवर
कोण आहेत शांताबाई पवार
त्यांच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ईटीव्ही भारतने त्यांच्या घरी जाऊन माहिती घेतली होती. पुण्याच्या हडपसरमधील गोसावीवस्ती येथे राहणाऱ्या शांताबाई पवार या वयाच्या 85 व्या वर्षीही मुलांच्या आणि नातवंडांच्या उदरनिर्वाहसाठी डोंबारी खेळातील कसरती दाखवतात. पतीच्या अकाली निधनानंतर शांताबाई यांच्यावर संकट कोसळले. सहा मुलांची व त्यांच्याबरोबर नातवंडांच्या उदरनिर्वाहाचीही जबाबदारी त्यांच्यावर पडली. संसाराचा गाडा ओढण्यासाठी त्यांनी जिद्दीने रस्त्यांवर साहसी खेळ सादर करायला सुरुवात केली. या वयातही काम करून शांताबाई आपल्याबरोबर आपल्या दहा अनाथ मुलांना मोठ्या हिंमतीने सांभाळत आहेत. त्यांच्या कुटुंबात लहान-मोठ्यासह 20 पेक्षा जास्त सदस्य आहेत. शांताबाई जागोजागी साहसी खेळाची प्रात्यक्षिके सादर करून मिळालेल्या पैशांतून घरखर्च भागवतात. या कलेच्या माध्यमातून आपल्या मुलांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांची नातवंडंदेखील त्यांना या खेळात मदत करत आहेत शांताबाईनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटातदेखील आपली कला सादर केली आहे. कोरोनाच्या या महासंकटात लोक रस्त्यावर येण्यासाठी घाबरत असताना ८५ वर्षांच्या शांताबाई पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर उतरून डोंबारी खेळातील कसरती सादर करत आहेत. शांताबाईंचा हा खडतर प्रवास धडधाकट लोकांसाठी नक्कीच प्रेरणा देणारा आहे.