मुंबई - सध्या मिनी-लॉकडाऊन मुळे सर्व कामांना खीळ बसली आहे. आणि त्यात मनोरंजनसृष्टीही मोडते. परंतु, कोरोनावर मात करण्याच्या निर्धार करत सर्वच जण त्याला काबूत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या वर्षीच्या सुरुवातीला आशावादी वातावरण निर्माण झाले होते आणि चित्रपटसृष्टीची सावरत चालली होती. त्याच सुमारास अनेक निर्मात्यांनी नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली. वेगवेगळ्या धाटणीच्या कथा, सादरीकरण यासह आता सिनेमात कलाकारांच्या नव्या फ्रेश जोड्या आणण्याकडेही निर्मात्यांचा कल असतो. लवकरच अभिनेता वृषभ शहा आणि अभिनेत्री शीतल अहिरराव ‘मंगलाष्टक रिटर्न' या चित्रपटातून प्रेक्षकांना भेटीला येत आहेत.
निर्माता वीरकुमार शहा आणि 'शारदा प्रॉडक्शन' या प्रॉडक्शन हाऊसतर्फे ‘मंगलाष्टक रिटर्न' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनास सज्ज आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक योगेश भोसले यांनी सांभाळली आहे. पहिल्यांदाच एकत्र काम करत असलेल्या वृषभ शहा आणि शीतल अहिरराव या नवीन जोडीची पडद्यावरील नवी केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सातत्याने नवे कोरे आणि चौकटी बाहेरचे विषय चित्रपट स्वीकारणारी शीतल आणि दमदार भूमिका स्वीकारत नवकलाकार असलेला वृषभ शहा या चित्रपटातून रोमान्स करताना दिसणार आहे. 'घटस्फोट लग्नसोहळा' ही सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पोस्ट 'मंगलाष्टक रिटर्न' चित्रपटातील आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे. कोरोना नियमांचे पालन करत या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक, आनंद इंगळे, प्रसन्न केतकर, कमलेश सावंत, भक्ती चव्हाण हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत. वृषभ शहा आणि शीतल अहिरराव ही जोडी वेगळ्या धाटणीच्या या सिनेमातून सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य नक्कीच गाजवेल याची खात्री आहे.