मुंबई - मराठी मनोरंजनसृष्टीत आता बऱ्याच वेब सिरीजही बनू लागल्या आहेत. नाटक, सिनेमा, मालिका या विश्वातून बाहेर पडत मराठी तरुणाई आता तिसऱ्या पडद्यावरील मनोरंजनाला जवळ करत आहे. कॅफेमराठी आणि हंगामा प्ले यांची निर्मिती असलेली एक नवीकोरी वेबसीरिज येत आहे. ‘गुडबॉय’ नावाच्या या वेब सिरीजमधून मुलींच्या मागे असलेल्या आणि तरीही खऱ्या प्रेमाच्या शोधात असलेल्या तरुणाची गोष्ट उलगडणार आहे. हल्लीच्या तरुणाईच्या चंचल प्रेमावरसुद्धा ही सिरीज चिमटे घेत भाष्य करते.
धमाल कथानक, उत्तम अभिनय आणि प्रत्येक एपिसोडला निर्माण होणारी उत्सुकता ही ‘गुडबॉय’ या सीरिजची वैशिष्ट्ये आहेत. आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या सिरीज मध्ये कॉलेजपासून सतत मुलींच्या मागे असलेल्या तरुणाला खऱ्या प्रेमाचा शोध कसा लागतो हे दर्शविण्यात आले आहे. मात्र त्याच्याविषयी मुलींमध्ये त्याच्याबद्दल एक वेगळाच समज निर्माण होतो आणि तो अडचणीत येतो. हा समज नेमका काय आहे? आणि यातून त्याच्या अडचणी कशा वाढत जातात आणि या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तो काय करतो, त्यातून तो यशस्वी होतो का, त्याला खरं प्रेम मिळतं का अशा प्रश्नांची उत्तरे वेब सीरीज पाहिल्यावरच मिळतील.
या वेबसिरीजमध्ये ऋषी सक्सेना, खुशबू तावडे, विनय येडेकर, रीना अगरवाल, दुष्यंत वाघ, योगेश सोहोनी, अभ्यंग कुवळेकर आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. बद्रिश पाटील यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. सौरभ मास्तोळी यांनी संगीत दिग्दर्शन, अक्षय राणे यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. उत्तम स्टारकास्ट असलेल्या या वेब सीरिजची निर्मिती कॅफेमराठीच्या निखिल रायबोले आणि भुपेंद्रकुमार नंदन यांनी केली.
हेही वाचा - दख्खनचा राजा ज्योतिबाला भेटला ‘छोटा ज्योतिबा’!