पुण्यात तब्बल १२ वर्षाच्या खंडानंतर यंदा पुन्हा 'जाणता राजा' या नाटकाचे पाच प्रयोग सादर होणार आहेत. येत्या २५ ते २९ डिसेंबर या कालावधीत हे प्रयोग दररोज सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहेत, अशी माहिती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. सिंहगड रस्त्यावरील शिंदे मैदानावर हे प्रयोग होणार आहेत. या प्रयोगाची सुरुवात विशेष सरकारी वकील उज्जवल निकम, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, विक्रम गायकवाड, पंढरीनाथ कंबळे, सचिन मोटे, सचिन गोस्वामी, समीर चौगुले यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दरम्यान यावर्षीपासूनच जाणता राजा पुरस्कार दिला जाणार आहे. त्यानुसार हा पहिला पुरस्कार रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना दिला जाणार असल्याचेही पुरंदरे यांनी सांगितले. येत्या 12 डिसेंबरला स्टेजचे भूमिपूजन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या नाटकाच्या प्रयोगाचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. त्यामुळे तेसुद्धा या नाटकाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
'जाणता राजा' या नाटकाचे आतापर्यंत 1550 प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग 14 एप्रिल 1984 रोजी झाला होता. हे नाटक एका अलौकिक मानवाचे दर्शन आहे. त्यामध्ये धंदेवाईक दृष्टी नसल्याचे पुरंदरे म्हणाले. यामध्ये १५० हून अधिक कलाकार, हत्ती, घोडे, उंट,बैलगाडी, नेत्रदीपक आतषबाजी व नवीन रंगमंचासहित शिवजन्म पूर्व काळ, शिवजन्म, शिवरायांचा न्याय निवाडा, रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, अफझलखान वध, सुरत छापा, शाहिस्तेखान छापा, आग्र्याहून सुटका आणि रोमहर्षक राज्यभिषेक सोहळा अशा अनेक प्रसंगांचे सादरीकरण या महानाट्यातून होणार आहे.
शिवाजी महाराजांप्रती असलेलं प्रेम आदर हे कृतीतून दिसावं
कोल्हापूर विद्यापीठातील नावाच्या मुद्यावरुन सुरू असलेल्या वादावर बाबासाहेब पुरंदरे यांनी मत व्यक्त केलं आहे. शिवाजी महाराज यांच्या प्रति असलेले प्रेम ,आदर हे कृतीतून दिसावं, शब्दांपुरते मर्यादित नसावं ज्याला जे प्रेमाने म्हणावं वाटतं ते म्हणावं, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.