छत्रपती शिवाजी महाराज या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका येऊ घातलीय. नेतोजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाला, तान्हाजी मालुसरे, कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, मुरारबाजी देशपांडे, कोंढाजी फर्जंद या शूरवीरांच्या कर्तबगारीला सलाम करण्यात येणार आहे. ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका या लवढय्यांच्या शौर्याला अर्पण असेल. अभिनेता भूषण प्रधान या मालिकेत छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार असून सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत दिसतील. तर अभिनेता कश्यप परुळेकर नेतोजी पालकरांची भूमिका साकारणार आहे.
या मालिकेविषयी विषयी सांगताना भूषण प्रधान म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज साकारताना उत्सुकता आणि धाकधुक दोन्ही वाढली आहे. छत्रपतींची भूमिका साकारणं हे प्रत्येक मराठी अभिनेत्याचं स्वप्न असतं. माझं देखिल स्वप्न पूर्ण होत आहे. मी बऱ्याच वर्षांपासून वाट पहात होतो की आपल्याला कधी महाराजांची भूमिका साकारायला मिळेल. माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीचं भान नक्कीच आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ‘जय भवानी जय शिवाजी’ ची संपूर्ण टीम मेहनत घेते आहे.’
या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचच नव्हे तर आपल्या देशाचं आराध्य दैवत. या महान राजाच्या सेवेत अनेक रत्न होती ज्यांनी महाराजांच्या शब्दासाठी आपला देव, देश आणि धर्मापायी प्राणांची आहुती दिली. महाराजांवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटकं, मालिका आणि चित्रपट निर्माण झाले आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा आपण पाहिली आहे. ती वर्णावी तेवढी थोडीच आहे. त्यांच्या शूर शिलेदारांची गोष्ट सांगणारी मालिका जय भवानी जय शिवाजी सादर करताना अभिमान वाटतो आहे. स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच मातीशी निगडीत आणि रुतलेल्या सशक्त कथा सादर करण्याचा प्रयत्न करत असते. ही मालिका त्या सर्व शूर वीरांना अर्पण असेल. स्वराज्यासाठी लढलेल्या प्रत्येकालाच या मालिकेच्या निमित्ताने मानाचा मुजरा.’
बाजीप्रभू देशपांडेंची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेते अजिंक्य देवही खुपच उत्सुक आहेत. ‘ बाजीप्रभूंच्या शौर्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पावनखिंडीमध्ये जीवाची बाजी लावत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. त्यामुळे बाजीप्रभू साकारताना प्रचंड आनंद होत आहे. अश्या या शूरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे.’
देव पुढे म्हणाले, ‘माझ्या करिअरची सुरुवातच सर्जा सिनेमातल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेने झाली होती. या भूमिकेसाठीचा लूकही माझ्यासाठी नवा आहे. फिटनेसच्या बाबतीत मी नेहमीच जागृक असतो. व्यायाम आणि खाण्यावरचं नियंत्रण यामुळेच मी फिट आहे. मी दररोज पाच ते सहा किलोमीटर धावतो. उत्तम आरोग्यासाठी हे सर्व गरजेचं आहे असं मला वाटतं. या सगळ्याचा उपयोग मला जय भवानी जय शिवाजी मालिकेत बाजीप्रभू साकारताना होतो आहे.’
‘जय भवानी जय शिवाजी’ ही शिवरायांच्या शिलेदारांची पराक्रमगाथा २६ जुलैपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा - निर्मात्यांना भुरळ घालणारे कथानक ‘देवदास’...आणि बरंच काही!