लहान वयातच शाल्व किंजवडेकरने मराठी चित्रपटांमधून भूमिका करत आपला अभिनय-प्रवास सुरु केला. ‘एक सांगायचंय’, ‘डेड एन्ड’ आणि माधुरी दीक्षितची मराठी डेब्यू फिल्म ‘बकेट लिस्ट’मधून त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दर्शविली होती. परंतु लहान पडद्यावरील एका मालिकेने त्याला खरी प्रसिद्धी मिळवून दिली. झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' या लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर अभिनेता शाल्व किंजवडेकरनं पदार्पण केलं आणि बघता बघता तो आता तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
![Shalv Kinjwadekar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-shalv-kinjwadwkar-yeu-kashi-tashi-mi-nandayala-mhc10001_23062021010912_2306f_1624390752_888.jpeg)
‘येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका दिवसागणिक जास्त लोकप्रिय होतेय आणि मालिकेप्रमाणेच शाल्वच्या लोकप्रियतेत सुद्धा वाढ होत चालली आहे. शाल्व म्हणाला की, "मालिकेची गोष्ट पुढे सरकते तसं पात्र उलगडत जातं. त्या पात्राला वेगवेगळे कंगोरे मिळत जातात. पुढे काय होणारे हे माहिती नसताना कथानकाप्रमाणे बदलणाऱ्या पात्राची मजा अनुभवता येतेय. हा खूप वेगळा अनुभव आहे.”
सध्या मालिकेत स्वीटू आणि ओमचं प्रेम बहरताना दिसतंय. मालिका जेव्हा लोकप्रिय होते तेव्हा त्या मालिकेतील कलाकारांची जबाबदारी अजून वाढते. याआधी शाल्व हा चित्रपट आणि वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे पण मालिका क्षेत्रातील पदार्पणातच मिळालेलं प्रेम हे शाल्वसाठी शब्दात वर्णन न करण्यासारखं आहे. ओमची भूमिका ही त्याच्यासाठी आव्हानात्मक आहे परंतु शाल्वच्या मते पहिल्याच मालिकेत दिग्गज कलाकारांबरोबर काम करीत असल्यामुळे खूप फायदा झाला आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा खूप आनंददायक आहे असे तो म्हणतो.
![Shalv Kinjwadekar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-shalv-kinjwadwkar-yeu-kashi-tashi-mi-nandayala-mhc10001_23062021010912_2306f_1624390752_877.jpeg)
ट्रोलिंग बद्दल बोलताना शाल्व म्हणाला, "ट्रोलिंग हासुद्धा एक प्रसिद्धीचा भाग आहे. मी तर ट्रोलिंग एन्जॉय करतो. ट्रोलिंग म्हणजे तुमच्याबद्दल, तुमच्या मालिकेबद्दल चर्चा होत आहे म्हणजेच ती लोकप्रिय आहे. प्रेक्षकांना एखादी गोष्ट मजेशीर वाटते किंवा एखादी गोष्ट आवडत नाही म्हणूनच ते ट्रोल करतात. मालिकेवर जे मीम्स येतात ते मी वाचतो. ते वाचून छान वाटतं की आपल्या मालिकेची चर्चा होतेय. तसंच जर का तुम्ही चिडला तर ट्रोलर्सना आसुरी आनंद मिळू शकतो."
छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला, “याआधी चित्रपट किंवा सीरिजमध्ये मी भूमिका साकारल्या आहेत. पण मालिकेत काम करताना खरंच खूप मजा येतेय. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मिळताहेत. याआधी मी मालिकेत कधी काम केलं नसल्यानं माझ्यासाठी ते आव्हान ठरेल असं मला वाटलं. पण मालिकेच्या निर्मात्यांना भेटल्यानंतर, तिथला परिसर, वातावरण, सेट सगळंच इतकं छान होतं की मी लगेच होकार दिला."
हेही वाचा - हर्षवर्धन कपूर आगामी रोमँटिक कॉमेडीमध्ये अलाया एफसोबत करणार रोमान्स?