गेली १६-१७ वर्षे महाराष्ट्राचे भावोजी आदेश बांदेकर तमाम वहिनींच्या घरी जाऊन पैठणीचा खेळ खेळत आले आहेत. गेल्या वर्षीपासून कोणाच्याही घरी जाणे शक्य नव्हते म्हणून लॉकडाऊनच्या काळात भाऊजी 'होम मिनिस्टर घरच्याघरी' द्वारे तमाम वहिनींची ऑनलाईन भेट घेत होते. पण आता पुन्हा एकदा ‘दार उघड वहिनी ...दार उघड ..’ असं म्हणत वहिनींच्या घरी हा पैठणीचा खेळ रंगवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं? दोघांपैकी कोण जास्त चिडतं? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणारा होम मिनिस्टर हा कार्यक्रम प्रेक्षकांचा आणि महाराष्ट्रातील तमाम वहिनींचा अत्यंत आवडता आहे. आता होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नवीन पर्वात एक ट्विस्ट असणार आहे. तमाम वहिनींच्या घरातील ‘लिटिल चॅम्प’ वहिनींना पैठणी मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे.
या नवीन पर्वाबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले, "एका दशकाहून जास्त होम मिनिस्टर हा कार्यक्रम महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील तमाम वहिनींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी देऊन सन्मान करत असून त्यांच्या चेहऱ्यावर एक छान हसू उमटवत आहे. या कार्यक्रमात अनेक विविध आणि नाविन्यपूर्ण स्वरूप प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आले. आता लिटिल चॅम्प्स या नवीन पर्वात वहिनींना त्यांच्या घरातील लिटिल चॅम्प्स पैठणी जिंकण्यात मदत करतील, त्यामुळे हा बदल सर्व प्रेक्षकांना आवडेल आणि तितकाच रंजक देखील वाटेल याची मला खात्री आहे."
ते पुढे म्हणाले, “या पर्वासाठी तमाम वाहिनी तसंच बच्चेकंपनी देखील उत्सुक आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट बघताय. या पर्वात तुमच्या लिटिल चॅम्प सोबत सहभागी व्हा आणि पैठणीच्या या वेगळ्या खेळाचा आनंद लुटा.”
‘होम मिनिस्टर’ चे ‘लिटिल चॅम्प्स’ चे हे नवीन पर्व २६ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा - राज कुंद्राने दिली क्राइम ब्रांचला लाच? फरार आरोपीचा दावा