पूर्वी भारतात हॉलिवूडचे चित्रपट फक्त इंग्रजी भाषेतच प्रदर्शित होत असत. परंतु आजच्या घडीला तेच इंग्रजीसोबतच हिंदी आणि अन्य प्रादेशिक भाषांमध्ये डब केले जाऊन प्रदर्शित होतात. यामुळे त्यांचे चित्रपट सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचतात. हिंदी चित्रपटांनाही हीच क्लुप्ती अवलंबिली असून त्यांचाही आर्थिक फायदा होतोय. परंतु आता जे हिंदी चित्रपट तामिळ, तेलगू, भोजपुरी आणि अन्य भाषेत डब होऊन प्रदर्शित व्हायचे ते आता मराठी भाषेतही दिसणार आहे. शेमारू मराठीबाणा वाहिनीने पुढाकार घेत विनोदी बॉलीवूडपटांची मराठमोळी मेजवानी मराठी भाषिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
मनोरंजनाला आता भाषेची अट नाही, आणि म्हणूनच बॉलीवूडचे गाजलेले तुफान विनोदी चित्रपट प्रेक्षकांना शेमारू मराठीबाणा चित्रपट वाहिनीवर आपल्या मराठी भाषेत पाहता येणार आहेत. सध्या सर्वत्र करोनाने घातलेले थैमान बघता प्रत्येकाला हास्याचा डोस देण्याची आवश्यकता आहे. हास्याचा हा डोस प्रत्येकाचं टेन्शन हलकं करत जगण्याची ऊर्जा कैकपटीने वाढवणार आहे. सध्याच्या काळात या डोसची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन शेमारू मराठीबाणा वाहिनीने बॉलीवूडच्या कॉमेडी चित्रपटांचा अस्सल फिल्मी नजराणा प्रेक्षकांसाठी आणला आहे. त्यामुळे हास्याचा आणि आपल्याच भाषेत चित्रपटाचा आनंद घेण्याचा हा डबल बुस्टर प्रेक्षकांचे ‘पैसा वसूल’ मनोरंजन करणार हे नक्की.
ऑगस्ट महिन्याच्या सलग ३ रविवारी या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा आनंद सहकुटुंब घेता येणार आहे. रविवार १ ऑगस्टला वेलकम, रविवार ८ ऑगस्टला ‘फिर हेराफेरी आणि रविवार १५ ऑगस्टला ‘भागमभाग‘ हे चित्रपट प्रसारित होणार असून यांचे मराठी नामकरण केले आहे. त्यांची अनुक्रमे मराठमोळी नावे आहेत, ‘एक झिंगाट कॉमेडी’, ‘पुन्हा गडबड पुन्हा गोंधळ’ आणि ‘राडा झाला रे’. या मराठी नावांवरून कल्पना आलीच असेल की प्रेक्षकांना असली मनोरंजनाचा तडका अनुभवायला मिळणार आहे. हे लोकप्रिय चित्रपट दुपारी १२.०० वा. आणि सायं ७.०० वा. पाहता येतील.
शेमारू मराठीबाणा वाहिनीवर प्रक्षेपित होणाऱ्या या चित्रपटांच्या निमित्ताने, प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टिस्टच्या आवाजाची जादू मराठी मध्ये प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आता बॉलिवूडचे तारे आपल्याला मराठीत हसवणार असल्याने हास्याचा धमाका प्रेक्षकांसाठी अधिक मनोरंजक असेल त्यासाठी ऑगस्टचे तीन रविवार राखून ठेवत ‘बॉलीवूड धमाका’ मधील हास्याची बरसात अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी सज्ज व्हावे असे शेमारूने म्हटले आहे.
हेही वाचा - नादखुळा म्युझिकचे पहिले गाणे ‘आपली यारी', १२ तास, १० लाख व्ह्यूज!