सध्या वेब शोजचा बोलबाला आहे. चित्रपटांत हाताळता न येणाऱ्या विषयांवर बिनदिक्कत भाष्य करता येणारा प्लॅटफॉर्म म्हणजे ओटीटी. मराठी चित्रपटांत आपली वेगळी छाप सोडलेले दिग्दर्शक समित कक्कड यांची वेब मालिका ‘इंदौरी इश्क’ मध्ये प्रेम, निष्ठा, प्रेमभंग आणि व्यभिचार यावर प्रभावी भाष्य केले आहे. याच्या आधी चार लक्षवेधी, अफलातून कथा रुपेरी पडद्यावर जिवंत केल्यानंतर लेखक-दिग्दर्शक-निर्माते समित कक्कड यांनी खास ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी ही ९ भागांची मालिका तयार केली आहे.
समितने यापूर्वी ‘आश्चर्यचकित’, ‘आयना का बायना’ आणि ‘हाफ टिकिट’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अत्यंत वास्तवदर्शी मांडणी आणि अप्रतिम तंत्रकौशल्य यामुळे त्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी समित यांनी ‘इंदौरी इश्क’ची निवड केली असून तीव्र भावना, हृदय पिळवटून टाकणारी वेदना आणि प्रेक्षकांच्या काळजाला हात घालेल असं संगीत याने ही मालिका त्यांनी अत्यंत लक्षवेधी केली आहे.
समित म्हणतो की, ‘मला गुणवत्ता, तंत्र आणि त्याचा टोन या कशाशीही तडजोड न करता त्या कथा जिवंत करण्याची प्रक्रिया मनापासून आवडते’.
‘इंदौरी इश्क’ या शो मध्ये आधुनिक काळातील प्रेमकहाण्यांमध्ये आढळणारा निष्ठा आणि व्यभिचार यांचा खेळ अत्यंत अनोख्या रीतीने गुंफण्यात आला आहे. ही एक अतिशय ‘हट के’ प्रेमकहाणी आहे. समितचा ट्रेड मार्क म्हणता येईल अशा तऱ्हेने साकारलेल्या या ‘इंदौरी इश्क’ नावाच्या मालिकेत अनिर्बंध प्रेमाची संकल्पना अत्यंत प्रभावीपणे हाताळण्यात आली असून आधुनिक काळातील प्रेमकहाण्यांत आढळून येणारा निष्ठा आणि व्यभिचाराचा खेळ सुद्धा यात प्रभावीपणे गुंफण्यात आला आहे.
समित कक्कडचे ‘आयना का बायना’ आणि ‘हाफ टिकिट’ सारखे आधीचे चित्रपट जगभरातल्या नामवंत चित्रपट महोत्सवांचा दौरा करून आले आहेत. २०१७ साली ५७ व्या झिल्न [Ziln] आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एक्युमेनिकल ज्युरी अवॉर्डसकट [Ecumenical Jury Award] अनेक पुरस्कार व सन्मान त्यांनी मिळवले आहेत. येत्या काही महिन्यांत ते त्यांच्या आगामी हिंदी चित्रपटाला सुरुवात करत असून सध्या ‘३६ गुण’ या त्यांच्या मराठी चित्रपटावर शेवटचा हात फिरवण्यात गुंतले आहेत. ‘समित कक्कड फिल्म्स’ चित्रपटांची निर्मितीही करते.
लेखक-निर्माता-दिग्दर्शक समित म्हणाला, ‘देशात असा कुणीही लेखक नसेल ज्याला डिजिटल प्लॅटफॉर्मने आकर्षित केलेले नाही. माझी आधीची एक फिल्म ‘आश्चर्यचकित’ ही थेट ‘नेटफ्लिक्स’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली फिल्म होती आणि विशेष म्हणजे, भारतात जेव्हा प्रेक्षक डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट वा मालिका वगैरे बघायच्या कल्पनेला सरावलेलेही नव्हते तेव्हा मी ती थेट ‘नेटफ्लिक्स’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे धाडस दाखवले होते. ‘इंदौरी इश्क’च्या माध्यमातून मी तरुण मुला-मुलींच्या मानसिकतेत डोकावायचा प्रयत्न केला आणि ते करताना मला खूप मजा आली. मुंबई आणि इंदौरमध्ये या मालिकेचे चित्रीकरण झाले असून माझ्या टीमच्या बरोबरीने या दोन्ही ठिकाणची अस्पर्श ठिकाणे शोधून तेथे चित्रीकरण करताना धमाल आली.’
९ भागांच्या ‘इंदौरी इश्क’ या मालिकेत कुणालची प्रेमकहाणी मांडण्यात आली आहे. त्याची प्रेयसी ताराने केलेला त्याचा प्रेमभंग आणि त्याचे परिणाम याने या प्रेमकहाणीची उत्कंठा आणि रंगत वाढवत नेली आहे. पंधरावड्यापूर्वी त्याचा टीजर आणि ट्रेलर प्रसारित करण्यात आला. त्याला तरुण वर्गाचा जोरदार प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा - मरुनही जगेल मी... राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संचारी विजय मृत्यूनंतरही अवयवदानातून राहणार जीवंत