मुंबई - डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आहे. सपना लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत होत्या. मात्र, रविवारी पत्रकार परिषद घेत सपनाने हे वृत्त फेटाळून लावले. यानंतर आता तिच्या भाजप प्रवेशाविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे.
या चर्चांना सुरूवात झाली आहे, मनोज तिवारी यांच्यासोबतच्या फोटोमुळे. मनोज तिवारी आणि सपना चौधरीचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या फोटोत सपनाने तोच ड्रेस घातला आहे जो रविवारी तिने काँग्रेस प्रवेशाबद्दलचे वृत्त अफवा असल्याचे सांगण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत घातला होता.
या ड्रेसमुळे सपनाने ही पत्रकार परिषद आटोपताच मनोज तिवारींची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच, तिच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. आता या वृत्तावर सपना काय प्रतिक्रिया देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.