मुंबई - मराठी मालिका सध्या महाराष्ट्राबाहेर शूट करत आहेत. महाराष्ट्रात कडक निर्बंध लागल्यामुळे व सर्व प्रकारच्या शूट्सला बंदी असल्यामुळे मालिका निर्मात्यांनी राज्याबाहेर चित्रीकरणासाठी सेट्स, रिसॉर्ट्स, बंगले इत्यादी भाड्याने घेतले आहेत. स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका आता राजकोटमध्ये शूट होत असून सर्व टीम कोरोना नियमांचे पालन करत नवीन भागांचे चित्रीकरण करत आहे. या मालिकेत आता पाककला स्पर्धेचा रोमांचक प्रवास पहायला मिळणार असून ती प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी ठरणार आहे.
![शुभम व कीर्ती](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-phulala-sugandh-maticha-international-cookery-competition-mhc10001_15052021235137_1505f_1621102897_200.jpeg)
प्रेक्षकांना रिजविण्यासाठी मालिका निर्माते-दिग्दर्शक-लेखक निरनिराळ्या क्लुप्त्या शोधात असतात. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत आता कीर्ती आणि शुभम यांच्यात एक वेगळीच स्पर्धा सुरू आहे. शुभमचे नाव जगभरात व्हावे हेच स्वप्न उराशी बाळगून कीर्ती हा सारा खटाटोप करते आहे. जागतिक दर्जाच्या ‘इंडियाज् बेस्ट कूक’ या पाककला स्पर्धेमध्ये शुभमने भाग घ्यावा यासाठी कीर्तीची धडपड सुरू आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जीजी अक्कांचा नकार आहे. शुभमही मनापासून राजी नाही. त्यामुळे जीजी अक्का आणि शुभमला या स्पर्धेचे महत्त्व पटवून देण्यासाठी कीर्तीने कंबर कसली आहे.
![छायाचित्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-phulala-sugandh-maticha-international-cookery-competition-mhc10001_15052021235137_1505f_1621102897_624.jpeg)
स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत लवकरच एक चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. शुभम उत्तम शेफ आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. शिर्डीमध्ये त्याने बनवलेल्या मिठाईला खास मागणी असते. ज्या शिर्डी शहराला शुभमच्या हातच्या चवीने वर्षानुवर्ष मोहित केले तीच चव आता जगाला मोहित करण्यासाठी सज्ज होते. आता कीर्तीच्या या प्रयत्नांना यश मिळणार का आणि शुभम या पाककला स्पर्धेसाठी कशी तयारी करणार तसेच या स्पर्धेत तो आपली चमक दाखवणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.
हेही वाचा - ‘येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत ‘तू मी आणि पुरणपोळी’ चित्रपट रूपात!