सोशल मीडिया हा लोकांमधील अंतर कमी करण्यासाठी तयार करण्यात आला होता. देशीविदेशी असणाऱ्यांसोबत संभाषण साधता यावे हे त्यामागील प्रमुख कारण. परंतु आता ते बाजूला पडलेले दिसत असून बरेचजण या माध्यमाचा वापर जहरी टीकेसाठी करतात. खासकरून सेलिब्रिटीजना याचा जास्त अनुभव येतो. बऱ्याचदा ‘बुरखा’ पांघरून म्हणजेच स्वतःची ओळख लपवून हे हल्ले केले जातात. सेलिब्रिटी असले तरी तीही माणसंच आहेत आणि त्यांनाही भावना आहेत याचा विसर या ‘ट्रॉलर्स’ना पडलेला दिसतो. मराठी मनोरंजनसृष्टीत नुकतीच नावारूपास आलेली अभिनेत्री अन्विता फलटणकरला जवळपास रोजच या ‘ट्रोलिंग’ चा सामना करायला लागतो. तिच्या वजनावरून तिला अनोळखी माणसं घालूनपाडून बोलत असतात.
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर हिने तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अन्विता फलटणकर एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. सोशल मीडियावर तिच्या डान्स-व्हिडीओज ना बरेच ‘लाईक्स’ मिळत असतात. मालिकेचा एकंदरीतच असलेला विषय आणि स्वीटूची व्यक्तिरेखा ही बऱ्याच मुलींसाठी खूप रिलेटेबल आहे. या मालिकेत एका वजनाने जास्त असलेल्या म्हणजेच जाड्या मुलीची प्रेमकहाणी फुलविण्यात आली असून या मालिकेला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळतोय. मालिकांमधील नायिका ही चवळीची शेंग असायला हवी या विचारसरणीला छेद देणारी ही मालिका आहे. वजन कमी असो वा जास्त, प्रत्येकाच्या भावना या सारख्याच असतात हे ही मालिका अधोरेखित करते.
जाडेपणाबद्दल बद्दल आपलं मत व्यक्त करताना स्वीटू म्हणजेच अन्विता म्हणाली, "मालिकेचा विषय साधारण त्याबद्दल असला तरीही सोशल मीडियावर वजनाबद्दल बोलणारे, विचारणारे आहेतच. कधीकधी खूप उदास वाटत असल्यावर या गोष्टींचा कुठेतरी त्रास होतो आणि वागण्यात फरक पडतो. पण मी आधीपासून अशीच आहे. त्यामुळे मी या परिस्थितीला हाताळायला शिकले आहे. आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे 'मी सुंदर आहे का?' हा प्रश्न मला पडलेला आहे. पण माझ्या आयुष्यात काही माणसांनी मला खूपच सकारात्मकता दिली. मी सगळ्यांना हेच सांगेन की, तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुमचं ‘असणं’ महत्त्वाचं आहे."
हेही वाचा - मानहानी प्रकरण; सलमान खानचा न्यायालयात नव्याने अर्ज दाखल