मुंबई - ‘अग्गोबाई सासूबाई’ या मालिकेतील ‘आसावरी’, म्हणजेच आपल्या ‘बबड्याची आई’, म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी कोरोनावर मात करून पुन्हा एकदा शूटिंग सेट गाठला. कोरोनावर मात करत पुन्हा शूटिंग सेटवर हजर झालेल्या निवेदिता सराफ यांचे मालिकेच्या संपूर्ण टीमने जोरदार स्वागत केले.
निवेदिता जोशी-सराफ यांनी २४ सप्टेंबर रोजी आपल्याला कोरोना झाल्याने आपण डॉक्टरांच्या सल्लानुसार घरातच होम क्वारंटािन होणार असल्याचे एका व्हिडीओद्वारे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या घरातच फॅमेली डॉक्टरच्या सल्ल्यानुसार गोळ्या औषधे घेऊन संपूर्णपणे आराम केला. आठ दिवस पूर्ण झाल्यावर डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केल्यावर आपली टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
आठवडाभर निवेदिता ताई नसल्याने मालिकेतील इतर कलावंतांनी आई नसल्यावर घर कसं खायला उठतं...असं म्हणत काही एपिसोड त्यांच्याशिवाय शूट केले. मात्र पूर्ण फिट झाल्यावर लागलीच निवेदिता सराफ पुन्हा एकदा शूटिंगसाठी सज्ज झाल्या. कालपासून त्यांनी पुन्हा एकदा मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली.
यावेळी त्यांचे सहकलाकार डॉ. गिरिश ओक, तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की यांच्यासोबतच मालिकेचे निर्माते सुनील भोसले, दिग्दर्शक अजय मयेकर आणि बाकी टीमने देखील खास पुष्पगुच्छ देऊन निवेदिता ताईंचे स्वागत केले. त्यांच्या अभिनयाने नटलेले ‘अग्गोबाई सासूबाई’चे नवीन एपिसोड आजपासून पुन्हा आपल्याला पहायला मिळतील.