ठाणे - सुमारे १३१ गायकांनी एकाचवेळी गायलेले “नाय दादागिरी चालणार कोणाची; यी तं मुंबय हाय आगर्या- कोळ्यांची” हे गीत ध्वनिमुद्रीत करण्यात आले आहे. आजवरच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येत गाणे गाण्याचा हा जागतिक विक्रम असून त्याची नोंद जागतिक पटलावर करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती या गीताचे संयोजक तथा गीतकार, गायक, संगीतकार अनिल वैती यांनी दिली.
मुंबईपासून ते कोकण किनारपट्टीवर वसलेला हा आगरी-कोळी समाज भूमिपुत्र म्हणून ओळखला जात आहे. हा समाज कलाप्रिय असल्याने या समाजामधून अनेक कलावंत निर्माण झाले आहेत. या कलावंतांनी एकत्रित गायलेल्या गाण्याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेस किसन फुलोरे, संतोष चौधरी (दादूस), जगदीश पाटील,हर्षाला पाटील आदी गायक उपस्थित होते.
यावेळी संतोष चौधरी उर्फ दादूस आणि जयदीश पाटील यांनी सांगितले की, आगरी कोळी पारंपरिक गीते, लोकगीते सर्वत्र प्रसिद्ध आहेत. याच आगरी कोळी समाजातील एक प्रसिद्ध गीतकार ज्यांनी आपल्या शब्दांद्वारे, लोककलेचा वारसा दाखवून देऊन, लोकगीतांचे प्रदर्शन जगासमोर मांडले आहे, असे गीतकार, गायक, संगीतकार अनिल वैती आणि त्यांचे पुत्र यश वैती यांनी आगरी समाजाचे प्रबोधन करण्याच्या उद्देशाने “नाय दादागिरी चालणार कोणाची , यी तं मुंबय हाय आगर्या कोळ्यांची” या गिताचे संयोजन केले आहे.
अनिल वैती यांनी या संदर्भात सांगितले की, या गाण्यामार्फत आगरी कोळी समाजाची संस्कृती, लोककला तसेच एकात्मता दर्शवण्याचा प्रयत्न आहे. तब्बल १३१ गायकांचा समावेश या गाण्यात केलेला आहे. प्रथमच लोकगीताच्या माध्यमातून हा आगळा वेगळा प्रयोग करण्यात आला आहे. या आधी १२१ वाद्यवृंदांनी आणि चार गायकांनी एक गाणे गायले होते. मात्र, प्रथमच १३१ गायकांनी एकत्र गाणे गाण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याने लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही वैती यांनी सांगितले.