गेल्या काही वर्षांत हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टींमधील दरी कमी होताना दिसतेय. बॉलिवूड चे कलाकार साऊथच्या चित्रपटांमध्ये तर दाक्षिणात्य स्टार्स हिंदी चित्रपटांचा भाग होताना दिसताहेत. तसेच बरेच हिंदी सिनेमे दाक्षिणात्य भाषांत डब होऊन दक्षिण भारतात रिलीज केले जातात. खरंतर छोट्या पडद्यावर अनेक दाक्षिणात्य सिनेमे हिंदीमध्ये डब करून दाखविले जातात आणि ते पाहणाऱ्यांच्या प्रेक्षकवर्गही खूप मोठा आहे. आता दाक्षिणात्य सिनेमे हिंदीमध्ये प्रदर्शित केले जात आहेत त्यातील एक आहे दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन अभिनित ‘पुष्पा : द राईझ’. ॲक्शन भरपूर असलेल्या या चित्रपटात रोमान्स, ड्रामा, कॉमेडी सुद्धा असून तो संपूर्णतः मनोरंजनात्मक सिनेमा आहे. दिग्दर्शकाने प्रेक्षकांना हवा असलेला ‘हिरो’ या चित्रपटातून पेश केला आहे.
पुष्पा राज (अल्लू अर्जुन) हा एका धनाढ्य सावकाराचा अनौरस पुत्र असतो परंतु आईने एकटीने त्याला मोठे केले असते म्हणून तिचा त्याला अभिमान असतो. परंतु सामाजिक टोमण्यांनी त्याला आतून जरी विमनस्क केले असले तरी बाहेरून तो कडक आणि स्वाभिमानी राहतो. तो शेषाचलम जंगलात मजूर म्हणून काम करीत असतो. खरंतर हे जंगल रक्तचंदनाच्या झाडांसाठी फेमस आहे आणि ते तोडण्याची सरकारकडून बंदी आहे. परंतु ‘चंदन तस्कर’ वीरप्पन प्रमाणेच काही सफेद कॉलर लोकं लाल चंदनाचे स्मगलिंग करीत असतात. जंगलातून चेन्नई व तेथून चीनमार्गे जपानपर्यंत ते पोहोचते. परंतु रक्तचंदन तस्करी ही या चित्रपटाची पार्श्वभूमी आहे आणि दिग्दर्शकाने पुष्पा या सामान्य मजदुराचा मालक होण्यापर्यंतचा प्रवास यात चितारला आहे. पुष्पाच्या भावनिक जीवनाचेही यातून दर्शन घडते. यात प्रेमाचा ट्रॅकही आहे. पुष्पा श्रीविल्ली (रश्मीका मंदाना) च्या प्रेमात पडतो आणि त्यांची लव्हस्टोरी विनोदी ढंगाने पुढे सरकते. साध्या मजूर म्हणून काम सुरु केलेल्या पुष्पा च्या धाडसी स्वभावामुळे तो अनेक धोके पत्करत रक्तचंदनाची तस्करी करण्यात मालकांना मदत करतो आणि त्या धंद्यात एक छोटासा पार्टनर बनतो. या खेळात अनेकजण असतात आणि पुष्पाची प्रगती पाहून त्याच्या जीवावर उठलेही असतात. पुष्पाचा प्रवास पुढे कुठपर्यंत आणि कसा जातो हे ‘पुष्पा : द राईझ’ मधून अधोरेखित केले आहे. याचा दुसरा भागही येतोय ज्यात तो आणि आयपीएस ऑफिसर भंवर सिंग शेखावत (फहाद फासील) यांच्या मित्रत्वाच्या नात्यातील ठसन वाढत जाणार असून तो पुष्पाच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याची शक्यता आहे.
तसं बघायला गेलं तर या चित्रपटाच्या कथेवर अनेकविध भाषांत बरेच चित्रपट बनले आहेत ज्यात एका सामान्य माणसाचा म्होरक्या होण्यापर्यंतचा प्रवास दर्शविण्यात आला आहे. परंतु हा जुना विषय दिग्दर्शक सुकुमार यांनी अत्यंत नावीन्यतेने सादर केला आहे. पटकथा पहिल्या भागात पकड घेणारी असून दुसऱ्या भागात थोडी ढेपाळाल्यागत वाटते. तसेच हा चित्रपट तब्बल तीन तासांचा आहे आणि संकलकाने त्याकडे लक्ष दिलं असतं तर चित्रपट अधिकतम प्रभावी झाला असता. या चित्रपटातील संवाद ऐंशी-नव्वदीच्या ‘डायलॉगबाझी’ करणाऱ्या चित्रपटांची आठवण करून देतील. अल्लू अर्जुन ला श्रेयस तळपदे चा आवाज लाभला असून संवादांमधील मराठी तडका महाराष्ट्रीयन प्रेक्षकांना सुखावून जाईल. सलमान खान च्या ‘राधे’ मधील ‘सिटी मार’ या गाण्याचे संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांचे संगीत आकर्षक असून यातील गाणी चित्रपटात चपखलपणे बसली आहेत. सामंथा अक्किनेनी चे ‘आयटम सॉंग’ सुद्धा भारी आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने दाक्षिणात्य प्रेक्षकांसोबतच हिंदी प्रेक्षकांना खुश केले आहे कारण ‘पुष्पा’ची हिंदी आवृत्तीसुद्धा प्रदर्शित झाली आहे. त्याचा स्टायलाइझ्ड अंदाज प्रेक्षकांना शिट्ट्या आणि टाळ्या मारायला नक्कीच उद्युक्त करेल. अर्जुनचा चित्रपटातील वावर दमदार असून त्याने अप्रतिम काम केले आहे. अर्जुन ने ॲक्शन, रोमान्स, कॉमेडी, इमोशन ई. सर्व स्तरावर उत्तम अभिनय केलाय आणि त्याच्या नृत्य पदलालित्याबद्दल तर त्याला फुल मार्क्स. दिग्दर्शकाने त्याच्या नृत्यनैपुण्याचा वापर चित्रपटातील मनोरंजकतेत वाढ करण्यासाठी स्मार्टपणे करून घेतला आहे. संपूर्ण चित्रपटभर सुपरस्टार अल्लू अर्जुन चा ‘ऑरा’ भासत राहतो, परंतु तो ‘पुष्पा’ च्या भूमिकेतही चपखलपणे बसलेला दिसतो. रश्मीका मंदाना दिसलीय सुंदर आणि ‘सामी सामी’ गाण्यात लक्ष वेधून घेते. तिला अभिनयासाठी फारसा स्कोप नाहीये परंतु तिने आपली भूमिका इमानदारीने निभावलीय. अजय घोष, धनंजय, सुनील सारख्या इतरही चरित्र भूमिकांमधील कलाकारांनी आपली निवड सार्थ ठरवली आहे. मिरोस्ला कुबा ब्रॉझेक यांचे छायाचित्रण अप्रतिम असून यातील ॲक्शन सीन्स बेफाटपणे चित्रित झाले आहेत, अर्थात ते लॉजिक बाजूला ठेवून एन्जॉय करावे लागतील.
एकंदरीत ‘पुष्पा : द राईझ’ हा भरपूर मनोरंजन करणारा चित्रपट असून अल्लू अर्जुन च्या फॅन्ससाठी पर्वणी आहे. या चित्रपटामुळे अल्लू अर्जुनच्या फॅन्समध्ये दाक्षिणात्य भाषांव्यतिरिक्त इतर भाषिक चाहते देखील सामील होतील हे नक्की.
हेही वाचा - Comedy Timing Of Akshay : अक्षय कुमारने विकी कॅटरिनाच्या लग्नावर केला मजेशीर विनोद