मुंबई - अभिनेता संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांची आज पुण्यतिथी आहे. वडिलांच्या आठवणीत संजय दत्त भावूक झालेला पाहायला मिळाला. सुनील दत्त यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संजय दत्तने एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
संजय दत्तने शेअर केलेल्या या फोटोत त्याची आई नर्गीस, त्याच्या दोन बहिणी आणि सुनील दत्त दिसत आहेत. ब्लॅक अॅण्ड व्हाईट असलेल्या या फोटोवर त्याने 'कुटुंबाचे आधारस्तंभ', असे कॅप्शन दिले आहे.
प्रिया दत्त यांनी देखील एक फोटो शेअर करून सुनील दत्त यांना आदरांजली वाहिली आहे. 'आईवडील हे खूप मौल्यवान असतात. त्यांची नेहमी काळजी घ्या. ते जेव्हा आपल्यासोबत नसतात, तेव्हा त्यांची कमतरता कोणीही भरून काढू शकत नाही', असे कॅप्शन त्यांनी शेअर केलेल्या फोटोवर दिले आहे.
सुनील दत्त यांनी ६०-७० च्या दशकात आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी गाजवली होती. एका अभिनेत्यासोबत त्यांनी निर्माते, दिग्दर्शक आणि राजकारणातही ठसा उमटवला आहे. त्यांनी मेरा साया, मदर इंडिया, साधना, गुमराह, यांसारख्या बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. 'मुन्ना भाई एम बी बी एस' या चित्रपटातही त्यांनी सुनील दत्तसोबत काम केले होते. त्यांची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. १९६८ साली त्यांना 'पद्मश्री' पुरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले होते.
२५ मे २००५ साली त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.