पुणे - अभिनेता अक्षय खन्ना आणि अभिनेत्री ऋचा चढ्ढा यांचा 'सेक्शन ३७५' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादात अडकला आहे. या चित्रपटातील काही दृश्यांवर आणि संवादावर आक्षेप घेत पुण्यातील वकील वाजीद खान यांनी न्यायालयात दावा केला होता. त्यामुळे पुणे दिवानी न्यायालयाने अक्षय खन्नाला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
'सेक्शन ३७५' हा चित्रपट बलात्कारासारख्या गंभीर विषयावर आधारित आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये न्यायालयात पीडित महिलेला आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याचा सिन दाखवण्यात आला आहे. यावर आक्षेप घेत वाजीद खान यांनी या दृश्यांमुळे पीडित महिलांच्या मनोबलावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे याविरोधात अभिनेत्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती.
या याचिकेवर पुणे दिवाणी न्यायालयाने अभिनेता अक्षय खन्ना आणि निर्माता कुमार पाठक यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.