लॉस एंजेलिस - सूर साम्राज्ञी लता मंगेशकर आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार यांचा 94 व्या अकादमी पुरस्कारांच्या 'इन मेमोरिअम' विभागाला विसर पडल्याचे दिसून आले. ब्रिटिश अकादमी फिल्म अँड टेलिव्हिजन अवॉर्ड्स (BAFTA) ने या महिन्याच्या सुरुवातीला स्वर्गीय लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांचे स्मरण करून त्यांचा सन्मान केला. मात्र 2022 च्या ऑस्कर सोहळ्यात भारतीय चित्रपटसृष्टीतील या दोन दिग्गजांची दखल घेण्यात आली नाही याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
2021 साली पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यामध्ये अभिनेता इरफान खान, ऋषी कपूर, सुशांत सिंग राजपूत आणि ऑस्कर-विजेत्या कॉस्च्युम डिझायनर भानू अथैया यांचा श्रद्धांजली विभागात समावेश करण्यात आला होता. त्यामुळे दिलीप कुमार आणि लता मंगेशकर यांसारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना श्रद्धांजली वाहिली नसल्याबद्दल चाहते सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत.
सिडनी पॉटियर, बेट्टी व्हाईट, कार्माइन सॅलिनास, ऑलिव्हिया ड्युकाकिस, विल्यम हर्ट, नेड बिट्टी, पीटर बोगदानोविच, क्लेरेन्स विल्यम्स तिसरा, मायकेल के विल्यम्स, जीन-पॉल बेलमोंडो, सॅली केलरमन, यवेट मिमेक्स, सोनी चिबा, सगिनॉ ग्रांट, डोरोथी यांसारख्या कलाकारांना येथील डॉल्बी थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात 'इन मेमोरिअम' विभागात श्रद्धांजली वाहण्यात आली.
"वेस्ट साइड स्टोरी" संगीतकार-गीतकार स्टीव्हन सोंधेम, सिनेमॅटोग्राफर हेला हचिन्स, निर्माते जेरोम हेलमन, डेव्हिड एच. डीपॅटी, मार्था डी लॉरेंटिस, ब्रायन गोल्डनर, इर्विन डब्ल्यू. यंग, अॅलन लॉर्ड जूनियर, "सुपरमॅन" दिग्दर्शक रिचर्ड डोनर, इतर सेलिब्रिटीज 'घोस्टबस्टर्स'चे निर्माते इव्हान रीटमन, कॉस्च्युम डिझायनर ईएमआय वाडा, दिग्दर्शक जीन-मार्क व्हॅली, लीना व्हर्टमुलर, डग्लस ट्रंबूल, फेलिप काजल, व्हिज्युअल इफेक्ट्स सुपरवायझर रॉबर्ट ब्लॅक, बिल टेलर यांच्यासह सिनेमा जगतातील कलाकारांचीही आठवण करण्यात आली.
हेही वाचा - काळ्या कपड्यातील जॅकलिन फर्नांडिसची चाहत्यांवर मोहिनी